पीक विम्यासाठी भाजपा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:37+5:302021-02-08T04:28:37+5:30
उस्मानाबाद : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे विमा कंपनीस ही भरपाई देण्यास भाग पाडावे; ...

पीक विम्यासाठी भाजपा आक्रमक
उस्मानाबाद : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे विमा कंपनीस ही भरपाई देण्यास भाग पाडावे; अथवा राज्य सरकारने द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी धरणे आंदाेलन करण्याचा निर्णय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसाेबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. बाधित शेतकरी ७२ तासांमध्ये विमा कंपनीला माहिती कळवू शकत नव्हते. जिल्हा प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर ही अट काही प्रमाणात शिथिल केली; परंतु २४ ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका विमा कंपनीने घेतली होती. याबाबत अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर कृषी आयुक्तांच्या सहकार्याने अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे; परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू शकले नाहीत. परिणामी, ते नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्याच्या अनुषंगाने आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडावे; अथवा राज्य सरकारने भरपाई द्यावी, या मागणीसाठी भाजपाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारीपासून जिल्हा कचेरीसमाेर साखळी धरणे आंदाेलन करण्याचे एकमताने ठरले. यावेळी जिल्हाभरातील शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
चाैकट...
कंपनीला भरले ६३९ काेटी, मिळाले ४९ काेटीच
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी विका कंपनीकडे भरलेला विमा हप्ता, राज्याचा व केंद्राचा वाटा एकत्रित केला असता, ही रक्कम ६३९ काेटी हाेते; परंतु शेतकऱ्यांना भरपाई म्हणून अवघे ४९ काेटी रुपये वाटप केले. विमा कंपनीच्या या नफेखाेरीबद्दलही उपस्थित शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.