भूम : भूम ते पाथरुड मार्गे खर्डा या राज्य मार्ग क्र. ५७ वरील पार्डी फाटा ते खेर्डा या ४५ किमी रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दणक्यात प्रवास करावा लागत असल्याने वाहनांची तर झिज होतेच, शिवाय वाहनधारकांच्या हाडांचादेखील अक्षरश: खुळखुळा होत आहे. शिवाय, नादुरूस्त रस्त्यामुळे वाहनांचा वेग कमी होताच लूटमार करण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. या रस्त्याची ओळख सध्या जंपिंग ग्राऊंड, अशी होऊ लागली आहे. खराब रस्त्यामुळे पार्डी घाट व अंतरवली परिसरात वाहने अडवून लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. पार्डी घाटात हा रस्ता ९ मीटर असून, उर्वरित खर्डापर्यंत ५.५० मीटर आहे. अगोदरच रस्ता अरूंद असून, त्यातच जागोजागी खड्डे पडल्यामुळे संपूर्ण ४५ किलोमीटरचा रस्ताच खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून पाठपुरावा सुरू असून, प्रशासन मात्र केवळ खड्डे बुजविण्याचे काम करून चालढकल करीत आहे. सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी अक्षरश: वृक्षारोपण करण्यासारखे खड्डे पडले आहे. यामुळे यातून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना अपघाताचा धोकाही वाढला आहे. विशेषत: एसटी चालकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुख्य रस्ता खड्ड्यांनी व्यापला असल्याने अनेक दुचाकी चालक साईटपट्टीवरुन वाहने चालवितात. यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत.
याच रस्त्यावरुन शिर्डी-नाशिकला जाण्यासाठी कर्नाटक, आध्रप्रदेशातून येणाऱ्या साई भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. शिवाय, भूम तालुक्यातून पुणे, नगर, जामखेडकडे जाणाऱ्या वाहनांचीही या रस्त्यावर नेहमीच ये-जा सुरू असते. मात्र नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनधारकांना ४५ किमीचे अंतर पार करण्यासाठी चक्क दोन तासांचा अवधी लागत आहे. शिवाय, खड्ड्यांमुळे टायर पंक्चर होणे, वाहनांच्या इतर भागाची मोडतोड होणे, असे प्रकार घडत असल्याने वाहनधारकांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
चौकट............
पार्डी घाट ते खेर्डा सरहद्दपर्यंत रस्ता कामाचे टेंडर झाले असून, वर्कऑर्डर व इतर कामांच्या मंजुरीसाठीची फाईल मंत्रालय स्तरावर आहे. साधरण दोन-तीन महिन्यांत या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- एच. सी. मुंढे, उपअभियंता, सा. बां. विभाग, भूम
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे कायम असून, दुरुस्तीकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकवेळा वाहनांचे नुकसान झाले आहे. यामार्गे पुण्याला जायचे म्हटले, तर अक्षरश: जिवावर येते. त्यामुळे प्रशासनाने हा प्रश्न लवकर मार्गी लावावा.
- रमेश आरगडे, वाहनधारक, भूम
या रस्त्यावरुन रात्रीच्यावेळी दुचाकी प्रवास टाळतो. शिवाय, दिवसादेखील मुख्य रस्ता सोडून साईडपट्टीवरून दुचाकी अगदी कमी वेगात घेऊन जावी लागते. तरीही दुचाकी स्लीप होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनीदेखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- सागर भागवत, दुचाकीस्वार, भूम
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता चांगला व्हावा, अशी मागणी होत आहे. परंतु, प्रशासनाने आजवर खड्डे बुजविण्याशिवाय काहीच केलेले नाही. त्यामुळे या रस्त्यासाठी आता ८ फेब्रुवारी रोजी भाजपच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
- महादेव वडेकर, तालुकाध्यक्ष, भाजप