सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:27 IST2025-11-05T15:27:03+5:302025-11-05T15:27:50+5:30
ही चोरी एका रात्रीत नव्हे, तर चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने झाली. स्टॉक व्हेरिफिकेशन म्हणजेच साठा तपासणीच्या बहाण्याने कोमलने सोने आणि हिरेजडीत दागिने हळूच बाजूला सारले.

सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
लखनऊतील गोमतीनगर परिसरात एका नामांकित ज्वेलरी शोरूममधून तब्बल अडीच कोटी रुपयांचे सोने आणि हिरेजडीत दागिने चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाइल चोरीमागे दुसरे-तिसरे कोणी नसून, गेली चार वर्षे शोरूममध्ये काम करणारी केवळ २२ हजार रुपये मासिक पगार घेणारी कोमल श्रीवास्तव नावाची महिला कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हच्या नावाखाली तिने गेल्या चार वर्षांत साडे दोन किलो सोन्याचे दागिने हळूहळू गायब केले. लग्झरी आयुष्य जगणाऱ्या या महिलेच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले, तेव्हा ती आणि तिचा पती फरार झाले होते. या घटनेने शोरूममधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि कर्मचाऱ्यांवरील विश्वासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी एका रात्रीत नव्हे, तर चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने झाली. स्टॉक व्हेरिफिकेशन म्हणजेच साठा तपासणीच्या बहाण्याने कोमलने सोने आणि हिरेजडीत दागिने हळूच बाजूला सारले.
दीपावलीच्या रात्री जेव्हा एक ग्राहक बायबॅक स्कीम अंतर्गत आपले जुने सोने परत घेण्यासाठी आला, तेव्हा कोमलने दिलेले उत्तर ऐकून कर्मचारीही हादरले. ग्राहकाने सोन्याची मागणी करताच ती म्हणाली, "अहो, ते तर वितळवले." काउंटरवरील कर्मचाऱ्याने लगेच विचारले, "सोनं वितळवण्याची काय गरज होती?" पण कोमलने काहीही स्पष्ट उत्तर न देता विषय टाळला. ग्राहक गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मॅनेजर धीरज डाल यांना ही माहिती दिली, आणि त्यानंतर शोरूम व्यवस्थापनाने तातडीने तपास सुरू केला.
सीसीटीव्हीने उघड केले कोमलचे सत्य
मॅनेजर धीरज यांनी तातडीने गेल्या ५-६ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये कोमलच्या हालचाली अत्यंत संशयास्पद वाटल्या. ती सोन्याचे कडे, नाणी आणि इतर दागिने अतिशय चलाखीने आपल्या साडीमध्ये किंवा बॅगमध्ये लपवताना दिसली. विशेषतः १५-१६ ऑक्टोबरच्या फुटेजमध्ये तर तिने उघडपणे दागिने कपड्यांमध्ये लपेटून बाहेर नेले होते.
स्टॉकची तपासणी केली असता अडीच किलो सोने गायब असल्याचे उघड झाले. बाजारमूल्यानुसार, याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. यापूर्वीही काही छोटी-मोठी चोरीची प्रकरणे नोंदवली गेली होती, पण कोमलवर असलेल्या अतिविश्वासामुळे कुणीही गंभीर तपास केला नव्हता.
२२ हजारांच्या पगारावर ७५ लाखांचा फ्लॅट!
मॅनेजर धीरज डाल यांनी सांगितले की, "कोमल कोविडनंतर नोकरीच्या शोधात आली होती. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य वाटल्याने आम्ही तिला बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हची जबाबदारी दिली. चार वर्षांत तिने सगळ्यांचा विश्वास जिंकला. चोरी उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापनाने कोमलला एक संधी दिली. आम्ही तिच्या घरी जाऊन चोरीचे सोने परत करण्याची विनंती केली, पण ती फरार झाली."
तिच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांनी लाखोंचे सोने आणि हिरेजडीत दागिने हस्तगत झाले. धक्कादायक म्हणजे, केवळ २२ हजार रुपये मासिक पगार असलेली ही महिला सुमारे ७०-७५ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करून त्याचे कर्जही फेडत होती. तसेच तिच्याकडे महागडी कारही होती. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, कोमलने चोरी केलेले सोने वितळवून बाजारात विकले असावे.
पतीने केला शोरूम व्यवस्थापनावर गैरवर्तनाचा आरोप
या प्रकरणाला आता एक नवीन कलाटणी मिळाली आहे. कोमल फरार असताना, तिच्या पतीने महानगर कोतवाली येथे शोरूम व्यवस्थापन आणि मॅनेजर धीरज डाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याने आरोप केला आहे की, शोरूममधील कर्मचाऱ्यांनी कोमलसोबत गैरवर्तन केले आणि तिच्यावर खोटे आरोप लावले आहे. निशातगंज पोलीस या तक्रारीचा तपास करत आहेत, तर गोमतीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सध्या कोमल आणि तिचा पती फरार असून, पोलिसांची पथके दिल्ली-एनसीआर आणि इतर शहरांमध्ये त्यांचा कसून शोध घेत आहेत.