पाणीपुरी खायला गेली पण आलीच नाही; पत्नीला कायमचं बाजूला करण्यासाठी रचला कट, असा पकडला गेली पती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:35 IST2025-11-25T16:25:21+5:302025-11-25T16:35:09+5:30
गुजरातमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पाणीपुरी खायला गेली पण आलीच नाही; पत्नीला कायमचं बाजूला करण्यासाठी रचला कट, असा पकडला गेली पती
Gujarat Crime: गुजरातच्या राजकोट शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूरतेची हद्द पार करणारी घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नीच्या सततच्या संशयामुळे आणि भांडणांमुळे कंटाळून, तिला पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने एका निर्जनस्थळी नेले आणि लोखंडी रॉडने डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण काही तासांतच पतीचा कट उघड झाला आणि त्याला अटक करण्यात आली.
राजकोटच्या भगवतीपरा भागातील रहिवासी हितेश आसोडिया याने त्याची पत्नी ३३ वर्षीय स्नेहाबेन आसोडिया हिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हितेशने पोलिसांना सांगितले की, स्नेहा त्याच्यावर सतत संशय घ्यायची, कामावर असताना वारंवार फोन करून वाद घालायची. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात सतत भांडणं होत असल्याने कारखान्यात काम करणारा हितेश मानसिकरित्या पूर्णपणे थकून गेला होता. या दोघांना दोन वर्षांचा मुलगाही आहे, ज्याला हितेशला दररोज सकाळी आई-वडिलांकडे सोडावे लागत होते.
शनिवारी संध्याकाळी स्नेहाने फोन करून हितेशला बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून चिडलेल्या हितेशने आपल्या वर्कशॉपमधून एक लोखंडी रॉड घेतला. त्याने घरी परत येऊन पत्नीला डिनरसाठी बाहेर घेऊन जाण्याची तयारी दाखवली. हितेश तिला स्कूटरवर बसवून त्यांच्या घराशेजारील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याने लघवी करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली. स्कूटरच्या पुढच्या बाजूला ठेवलेला लोखंडी रॉड काढला आणि मागे बसलेल्या स्नेहावर अचानक हल्ला केला.
हितेशने लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर क्रूरपणे प्रहार केले ज्यामुळे स्नेहा जागेवरच कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. स्नेहाची हत्या केल्यानंतर हितेशने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक खोटी कहाणी रचली. त्याने पोलिसांना सांगितले की, स्नेहा पाणीपुरी खाण्यासाठी घराबाहेर गेली होती आणि ती परतलीच नाही. मात्र, त्याच दिवशी सकाळी पोलिसांनी बेडी चौकडीजवळील भगवतीपरा भागात एका महिलेचा डोके ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटल्यावर ती हितेशची पत्नी स्नेहाच असल्याचे स्पष्ट झाले.
काही तासांतच पोलिसांना हितेशने दिलेल्या माहितीत काहीतरी संशयास्पद असल्याचे जाणवले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर हितेशने पत्नीला लोखंडी रॉडने मारल्याची कबुली दिली. पोलिसांनी हितेशला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.