"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:47 IST2026-01-07T11:45:05+5:302026-01-07T11:47:10+5:30
आपल्या पत्नीने घटस्फोट न घेताच दुसऱ्या तरुणाशी लग्न केलं आणि पोलीस या प्रकरणी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप रवीने केला आहे.

फोटो - आजतक
सहारनपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खळबळ उडाली आहे, एक तरुण न्यायाच्या मागणीसाठी थेट उपोषणाला बसला आहे. 'रवी कुमार' असं या तरुणाचं नाव असून त्याने अन्नत्याग करून आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या पत्नीने घटस्फोट न घेताच दुसऱ्या तरुणाशी लग्न केलं आणि पोलीस या प्रकरणी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप रवीने केला आहे.
रवी कुमारने दिलेल्या माहितीनुसार, त्याचं लग्न २ जुलै २०१८ रोजी राधिका हिच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही काळातच पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरली आणि ती फरार झाली. इतकंच नाही तर तिने रवी आणि त्याच्या कुटुंबावर हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराचे खोटे गुन्हे दाखल केले. मात्र कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत रवीला या सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे.
घटस्फोट न घेताच लग्न
रवीचा आरोप आहे की, ऑगस्ट २०२३ मध्ये त्याच्या पत्नीने घटस्फोट न घेताच दीपक नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध ठेवले आणि त्याच्याशी लग्न केलं. त्यांना आता एक मूलही आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस कोणतीही दखल घेत नसल्याचे रविचे म्हणणे आहे. घरातून चोरीला गेलेला माल अजूनही जप्त करण्यात आलेला नाही आणि तपास अधिकाऱ्यांनी खोटे जबाब नोंदवले आहेत, असा गंभीर आरोपही त्याने केला आहे.
न्यायासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव
रवि कुमारने सांगितलं की, त्याने पोलीस स्टेशन, एसएसपी, डीआयजी, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री पोर्टलपर्यंत अनेकदा तक्रारी केल्या, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आई-वडिलांचे छत्र हरवलेला आणि स्वतः गंभीर आजाराशी झुंज देणारा रवी आता एकटाच ही लढाई लढत आहे. "माझ्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले, मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आलं. मला न्याय मिळत नाही. आता जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही. शंभर दिवस बकरीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगलेलं चांगलं!" असं रवीने म्हटलं आहे.