...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 06:02 IST2025-12-16T06:02:32+5:302025-12-16T06:02:48+5:30
पश्चिमेच्या एकता नगरमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तेथील गुंडांनी हल्ला केला आणि त्यांची कॉलर पकडली.

...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
मुंबई: "कायद्याचे हात खूप लांब असतात..." हा डायलॉग अनेक सिनेमांत आपण ऐकला आहे; पण, गुन्हेगारांची मजल कायदा रक्षकांच्या कॉलरला हात घालण्यापर्यंत गेल्याची घटना मात्र विरळच. कांदिवलीत रविवारी रात्री अशीच घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
पश्चिमेच्या एकता नगरमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तेथील गुंडांनी हल्ला केला आणि त्यांची कॉलर पकडली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. पोलिस सूत्रांनी कांदिवली दिलेल्या माहितीनुसार, एकतानगरमध्ये अनिल यादव याचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न नितेश आणि इलायची यांनी केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती अनिल याने त्याचा नातेवाईक शिवम यादवला दिली. त्यानंतर शिवम दशरथ कनोजिया हा भीम कनोजियासह नितेशला जाब विचारण्यासाठी गेला. त्यावेळी नितेश, पप्पू झा आणि विकी सिंह यांच्यात हाणामारी झाली.
या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आणि ५ जणांना अटक करण्यात आली. पप्पू झाचे वडील, आई आणि भाऊ यांचा शोध सुरू आहे.
कामात आणला व्यत्यय
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पप्पू झा, त्याचे वडील चंद्रकांत झा, आई सुमन झा, भाऊ गुड्डू झा आणि विकी सिंह यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या कामात व्यत्यय आणला, तर त्यापैकी काहींनी पोलिसांची कॉलर पकडली. व्हायरल व्हिडीओमध्ये हे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.
स्पेशल ब्रँचकडे सोपवला तपास
कांदिवलीतील एकता नगरजवळील लालजीपाडा दीपक पार्किंग परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांशी हुज्जत, थक्काबुक्की, त्यांना शिवीगाळ करून मारहाण, तसेच शासकीय वाहनावर दगड मारून त्याचे नुकसान आरोपींनी केले.
याप्रकरणी आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांच्या स्पेशल अँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.