Video : नागपूरच्या ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या दरोड्याचा थरारक व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:09 IST2021-07-14T11:07:29+5:302021-07-14T11:09:07+5:30
पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता

Video : नागपूरच्या ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या दरोड्याचा थरारक व्हिडिओ आला समोर
नागपूर : शहरातील जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये गेल्या आठवड्यात पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा नागपूरपोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी मध्यप्रदेशातील कटनी येथे या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. जरीपटक्यातील भीम चौकाजवळ असलेल्या अवनी ज्वेलर्समध्ये चार दरोडेखोरांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता दरोडा घातला होता. आता, या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे.
पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता. अत्यंत वर्दळीच्या भागात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियातून समोर आले आहेत. दरोडेखोरांनी अगोदर सोने घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर, विचारपूस करतेवेळी दुकानदारावर हल्ला केला. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी दुकानातील सोने आणि साहित्य घेवून पोबारा केला.
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढला. ते मनसर-देवलापार मार्गे मध्यप्रदेशमध्ये पळून गेल्याचा अंदाज येताच पोलिसांच्या पथकाने तिकडे धाव घेतली. मध्यप्रदेश पोलिसांनाही कळविले. त्यानुसार रात्रीच्या सुमारास कटनी जवळ दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. लुटीतील वीरेंद्र यादव आणि दीपक त्रिपाठी या दोघांना मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. ही टोळी उत्तरप्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.