इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो; 52 वर्षीय महिला 26 वर्षीय तरुणाच्या प्रेमात, असा झाला रक्तरंजित अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:09 IST2025-09-02T17:09:04+5:302025-09-02T17:09:42+5:30
Uttar Pradesh Crime: महिलेने इंस्टाग्रामवर एडीट केलेले फोटो टाकले; तरुण प्रेमात पडला..!

इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो; 52 वर्षीय महिला 26 वर्षीय तरुणाच्या प्रेमात, असा झाला रक्तरंजित अंत
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून एक प्रेम प्रकरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ५२ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या २६ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या प्रेम प्रकरणात महिलेने लग्न आणि पैशासाठी दबाव आणल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलले.
फर्रुखाबादची रहिवासी असलेली ५२ वर्षीय महिला तिच्या अर्ध्या वयाच्या मुलाच्या प्रेमात पडली. दोघेही इंस्टाग्रामद्वारे जवळ आले होते. महिलेने इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो वापरल्यामुळे मुलाला तिचे वय कळले नाही. परंतु हेच प्रेम महिलेच्या जीवावर उठले. लग्न आणि पैशांसाठी दबाव टाकल्यामुळे वैतागलेल्या तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. सुमारे एका महिन्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
असा झाला खुलासा
मैनपुरीच्या कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचे नाव राणी असल्याचे पोलिसांना तपासात समजले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या हत्याकांडाची उकल करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सखोल तपासानंतर पोलिसांनी आरोपी अरुण राजपूतला अटक केली. आरोपीने इन्स्टाग्रामद्वारे महिलेशी मैत्री केली होती. अरुणने चौकशीदरम्यान सांगितले की, महिलेने तिचे वय लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला होता.
एसपी अरुण कुमार सिंह म्हणाले की, मृत महिला राणी (५२) आणि आरोपी अरुण राजपूत (२६) यांची दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर मैत्री झाली. राणीला चार मुले आहेत. मैत्रीनंतर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू झाली. महिलेने तिचे वय लपवण्यासाठी इन्स्टाग्रामवर फिल्टरचा वापर केला होता, ज्यामुळे आरोपी तिच्या जाळ्यात अडकला. नंतर महिलेने अरुणवर लग्न करण्यासाठी आणि तिने दिलेले १.५ लाख रुपये परत करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.
लग्न आणि पैशाच्या दबावामुळे हत्या
महिलेच्या सततच्या दबावामुळे आरोपी नाराज होता. १० ऑगस्ट रोजी त्याने राणीला मैनपुरी येथे बोलावले. दोघेही खारपरी बांबा जवळील झुडपात भेटले. तिथे राणीने पुन्हा त्याच्याशी लग्न करण्याची आणि पैसे परत करण्याची मागणी केली. तसेच, अरुणला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकीही दिली. रागाच्या भरात अरुणने राणीचा दुपट्ट्याने गळा दाबला आणि घटनास्थळावरून पळ काढला. कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.