Nikitha Godishala Murder: "तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:02 IST2026-01-06T12:01:35+5:302026-01-06T12:02:24+5:30
Nikitha Godishala Murder Case: निकिताच्या वडिलांनी आता या प्रकरणात एक मोठा खुलासा केला असून आरोपी हा तिचा बॉयफ्रेंड नसून केवळ 'रूममेट' होता, असा दावा केला आहे.

Nikitha Godishala Murder: "तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा
अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील हॉवर्ड काउंटीमध्ये २७ वर्षीय भारतीय तरुणी निकिता गोडीशाला हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा याच्यावर संशय व्यक्त केला आहे. मात्र निकिताच्या वडिलांनी आता या प्रकरणात एक मोठा खुलासा केला असून आरोपी हा तिचा बॉयफ्रेंड नसून केवळ 'रूममेट' होता, असा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन शर्माने तिची हत्या केली आणि त्यानंतर तो भारतात पळून गेला आहे. मात्र, हैदराबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना निकिताचे वडील आनंद गोडीशाला यांनी पोलिसांचे आणि मीडियाचे दावे फेटाळून लावले आहेत.
आनंद गोडीशाला यांनी स्पष्ट केलं की, २६ वर्षीय आरोपी अर्जुन हा निकिताचा बॉयफ्रेंड नव्हता. ते म्हणाले, "माझी मुलगी चार वर्षांपूर्वी कामासाठी कोलंबियाला गेली होती. एका अपार्टमेंटमध्ये चार जण एकत्र राहत होते, अर्जुन त्यापैकी एक होता. तो तिचा रूममेट होता, बॉयफ्रेंड नाही." त्यांच्या मते, ही हत्या आर्थिक वादातून झाली आहे. अर्जुनने निकिताकडून वारंवार पैसे घेतले होते. जेव्हा निकिताने आपले पैसे परत मागितले, तेव्हा त्याने रागाच्या भरात तिची हत्या केली आणि तिथून पळ काढला.
निकिताची चुलत बहीण सरस्वती गोडीशाला हिने याप्रकरणी अमेरिकेतील भारतीय दूतावासात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुनने हत्येच्या काही दिवस आधी निकिताकडून ४,५०० अमेरिकन डॉलर (सुमारे ४.०७ लाख रुपये) उधार घेतले होते. त्यापैकी त्याने ३,५०० डॉलर परत केले होते, परंतु उरलेल्या १,००० डॉलरसाठी निकिताने तगादा लावला असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. निकिताला समजलं होतं की अर्जुनने इतर अनेक लोकांकडूनही कर्ज घेतले आहे आणि तो कायमचा भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहे. याच वादातून त्याने निकिताचा काटा काढल्याचा आरोप तिचे वडील करत आहेत.