नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:49 IST2025-08-18T11:49:26+5:302025-08-18T11:49:51+5:30
UP Crime: चोरलेल्या पैशातून गावाकडे १० लाख रुपयांची जमीनही खरेदी केली.

नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली
UP Crime: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या निशातगंज परिसरातून चोरीची विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सहसा चोरीचा आरोपी पैसे घेऊन पळून जातो किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करतो, परंतु लखनऊमधील घटना पूर्णपणे वेगळी आहे. एका व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या नोकराने घरातून लाखो रुपये आणि दागिने चोरले. मात्र, त्याने पळून न जाता किंवा चैनीच्या वस्तू खरेदी न करता, हे पैसे विविध योजनेत गुंतवले. आरोपीने चोरीच्या पैशातून विमा पॉलिसी खरेदी केली, एसआयपी आणि एफडीमध्ये गुंतवणूक केली. इतकेच नाही, तर त्याने दहा लाख रुपयांची जमीनदेखील खरेदी केली.
अनेक वर्षांपासून कराये चोरी
संबंधित व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, त्याच्या घरात काम करणारा नोकर आणि त्याची पत्नी मूळचे बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून त्याच्या घरात काम करत होते. त्यांनी मालकाचा विश्वास संपादन केला होता, त्यामुळे त्यांना घराच्या प्रत्येक खोलीत जाण्याची मुभा होती. या नोकर जोडप्याने या विश्वासाचा गैरफायदा घेत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी सुरू केली.
रोख आणि दागिने गायब
आरोपी नोकराने घरातून लाखो रुपये रोख आणि लाखोंचे दागिने चोरले. सुरुवातीला मालकाला काहीच समजले नाही. मात्र, नंतर त्याने कपाटांची तपासणी केली तेव्हा त्याला संशय आला. त्याने याबाबत नोकराची विचारपूस केली तेव्हा आरोपीने चोरीची कबुली दिली. चौकशीदरम्यान नोकराने सांगितले की, त्याने चोरीचे पैसे खर्च केले नाहीत, तर त्याच्या शहरातील एका बँक कर्मचाऱ्याच्या मदतीने ते विविध ठिकाणी गुंतवले. त्याने या पैशांतून विमा पॉलिसी खरेदी केल्या, एसआयपी आणि एफडीमध्येही गुंतवणूक केली. इतकेच नाही तर दहा लाख रुपयांची जमीन देखील खरेदी केली.
फसवणूक करुन दोघेही पळून गेले
आरोपी नोकराने चोरलेले सामान परत देण्याचे आश्वासन देण्याचे नाटक केले आणि पत्नीसह पळून गेला. त्यानंतर व्यावसायिकाने ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नोकर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिस या प्रकरणात बँक कर्मचाऱ्याची भूमिकाही तपासत आहेत. व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, आरोपी नोकराने चौकशीत स्पष्टपणे सांगितले होते की, त्याने बँक कर्मचाऱ्याच्या मदतीने गुंतवणूक केली.
गुंतवणुकीच्या नावाखाली कोणत्या योजनांमध्ये किती पैसे गुंतवले गेले आहेत आणि कोणत्या कंपन्यांमध्ये किंवा बँकांमध्ये व्यवहार केले गेले आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही सामान्य चोरीची घटना नाही तर एक नियोजित आर्थिक गुन्हा आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले जात आहेत. गुंतवणूक कागदपत्रे, बँक खाती आणि व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. लवकरच नोकर आणि त्याच्या पत्नीला अटक केली जाईल.