रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 21:02 IST2026-01-07T21:01:51+5:302026-01-07T21:02:28+5:30
फरार आरोपीला शोधण्यासाठी चार पथके रवाना.

रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात एक आरोपी चक्क पोलिस अधिकारी आहे. रक्षकच भक्षक बनल्यामुळे परिसरातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अपहरण आणि दोन तास अत्याचार
पीडित मुलगी सोमवारी रात्री सुमारे 10 वाजता शौचासाठी घराबाहेर पडली असताना स्कॉर्पिओ कार आणि दुचाकीवर आलेल्या तरुणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये ओढून नेले. सचेंडी परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन कारमध्येच तिच्यावर बारी-बारीने बलात्कार करण्यात आला. सुमारे दोन तासांनंतर पीडितेला घराजवळ फेकून आरोपी फरार झाले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकीही आरोपींनी दिली.
आरोपी पोलिस फरार...
तपासात भीमसेन चौकीतील पोलिस निरीक्षक अमित मौर्य याचा गुन्ह्यात सहभाग असल्याची पुष्टी झाली आहे. त्याने शिवबरन नावाच्या तरुणासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी शिवबरन अटक केली असून, अमित मौर्य फरार आहे. दरम्यान, या प्रकरणाची एफआयआर उशिरा नोंदवल्याप्रकरणी सचेंडी पोलिस ठाण्याचे प्रमुख विक्रम सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, फरार आरोपी अमित मौर्य याच्या अटकेसाठी चार विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.