ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:36 IST2025-10-06T19:36:02+5:302025-10-06T19:36:22+5:30
या घक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले
लखनऊ:उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या स्वतःच्या आईची क्रूरपणे हत्या केली. आधी त्याने स्क्रू ड्रायव्हरने आईवर वार केला आणि नंतर गॅस सिलेंडरने तिचे डोके चिरडून ठार मारले. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला, मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लखनऊतील या हत्याकांडाने सगळ्यांना हादरवले आहे. पोलिस तपासात उघड झाले की, मुलाचे ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगचे व्यसनच या भीषण घटनेचे मूळ कारण आहे. आरोपी निखिल यादवने ऑनलाइन गेममध्ये ₹24,000 गमावले होते. ही रक्कम परत देण्यासाठी त्याने कर्ज घेतले आणि आता वसुलीसाठी लोक त्याच्यावर दबाव आणत होते. पैसे मिळवण्यासाठी त्याने आईचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला, पण आईने विरोध केला असता, आरोपीने रागाच्या भरात आईचा खून केला.
हत्या कशी केली?
निखिलने आधी आईवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला केला आणि नंतर गॅस सिलेंडरने तिचे डोके ठेचले. हत्या केल्यानंतर तो घरातील 5-6 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला पकडले. डीसीपी साऊथ निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, “ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने मुलाला राक्षस बनवले. या प्रकरणाने दाखवून दिले की, हे व्यसन किती धोकादायक ठरू शकते.” या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक विश्वास ठेवू शकत नाहीत की, एक मुलगा पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या आईचा जीव घेऊ शकतो.