जमीन नावावर केली नाही म्हणून बापाचाच काटा काढला; बहिणीसह पुतणीची हत्या करुन विहिरीत फेकले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:02 IST2026-01-06T09:59:14+5:302026-01-06T10:02:53+5:30
उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकण्यात आले होते.

जमीन नावावर केली नाही म्हणून बापाचाच काटा काढला; बहिणीसह पुतणीची हत्या करुन विहिरीत फेकले मृतदेह
UP Crime: उत्तर प्रदेशमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना उघडकीस आली आहे. मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने आपल्या धाकट्या भावावर गोळीबार केला, एवढेच नव्हे तर स्वतःचे वडील, बहीण आणि अल्पवयीन पुतणीचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने तिन्ही मृतदेह एका विहिरीत फेकून दिले. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राम सिंह (५५), त्यांची मुलगी साधना देवी (२१) आणि १४ वर्षांची नात अचानक बेपत्ता झाले होते. दोन दिवस शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता न लागल्याने पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान पोलिसांनी राम सिंह यांचा थोरला मुलगा मुकेश पटेल याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मुकेशने आपला गुन्हा कबूल केला आणि हादरवून टाकणारा घटनाक्रम सांगितला.
पोलीस तपासात समोर आले की, आरोपी मुकेशचे वडील राम सिंह यांनी आपली सर्व मालमत्ता धाकटा मुलगा मुकुंद याच्या नावावर केली होती. या निर्णयामुळे मुकेश गेल्या अनेक महिन्यांपासून रागात होता. याच रागातून त्याने संपूर्ण कुटुंबाचा काटा काढण्याचे कारस्थान रचले.
आधी भावावर गोळीबार, मग तिघांचे अपहरण
मुकेशने शनिवारी प्रथम आपला धाकटा भाऊ मुकुंद याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून मुकुंद थोडक्यात बचावला. जखमी अवस्थेत मुकुंदने पोलीस ठाणे गाठून वडील, बहीण आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुकुंदला त्यावेळी कल्पनाही नव्हती की, ज्या भावाने आपल्यावर गोळी झाडली त्याने आधीच घरातील तिघांचा जीव घेतला आहे.
विहिरीत सापडले मृतदेह
मुकेशने वडिलांसह तिघांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह एका विहिरीत फेकून दिले होते. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो बेपत्ता असल्याचे नाटक करत होता. मात्र, अटकेनंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढले.
पोलीस कारवाई
पोलिसांनी मुकेश पटेल विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. जखमी मुकुंदवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आता या प्रकरणाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करत असून मुकेशला कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास करत आहेत.