उन्नाव प्रकरणात मोठा खुलासा! एकतर्फी प्रेमातून केली हत्या, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 09:12 AM2021-02-20T09:12:27+5:302021-02-20T09:14:08+5:30

Unnao Crime News : उन्नाव जिल्ह्यामध्ये शेतात दोन मुलींचे मृतदेह हे संशयास्पद अवस्थेत आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

unnao up police exposed minor girls murder case love affair gave pesticide mixed water | उन्नाव प्रकरणात मोठा खुलासा! एकतर्फी प्रेमातून केली हत्या, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

उन्नाव प्रकरणात मोठा खुलासा! एकतर्फी प्रेमातून केली हत्या, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील उन्नाव (Unnao Crime News) मध्ये एक भयंकर घटना घडली  आहे. उन्नाव जिल्ह्यामध्ये शेतात दोन मुलींचे मृतदेह हे संशयास्पद अवस्थेत आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता उन्नाव प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला असून पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली आहे. काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना स्नॅक्स खाऊ घातल्यानंतर त्यांना कीटकनाशक पाण्यात मिसळून पाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

उन्नाव प्रकरणातील एका मुलीवर कानपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला योग्य प्रतिसाद देत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तिला हळूहळू व्हेंटिलेटरवरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच ती लवकरात लवकर ठीक होईल अशी आशा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आयजी लक्ष्मी सिंह यांनी याबाबत खुलासा करताना घटनेच्या दिवशी दोघेजण शेतातून पळताना दिसले होती. अशी माहिती शनिवारी सकाळी पोलिसांना गावातील एका प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना पाटकपुरा चौकातून ताब्यात घेतलं असल्याचं म्हटलं आहे.

विनयने शेतातील कीटकनाशक पाण्याच्या बाटलीत मिसळलं

आरोपी विनयची शेती पीडित मुलींच्या वडिलांच्या शेतीला लागूनच आहे. आरोपी विनय दररोज शेतात काम करण्यासाठी येथे येत असायचा. लॉकडाऊनच्या काळात विनयची या मुलींशी ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी विनयची एका मुलीशी मैत्री झाली होती. विनय या पीडित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पण मुलीने आरोपीला होकार दिला नव्हता. त्यामुळे आरोपीने या मुलींना शेतावर बोलावून त्यांना स्नॅक्स खायला दिले. त्यानंतर त्यांच्याशी बराच वेळ बोलत बसला. याचवेळी आरोपी विनयने शेतातील कीटकनाशक पाण्याच्या बाटलीत मिसळलं. त्यातील एका अल्पवयीन मुलीला याच बाटलीतील पाणी पाजायचं होतं. 

संबंधित मुलीसोबत आलेल्या दुसऱ्या दोन मुलींनी आरोपीकडे पाण्याची मागणी केली. पण आरोपी विनयने कीटकनाशक मिश्रीत पाणी देण्यास नकार दिला. पण पीडित मुलींनी ती पाण्याची बाटली हिसकावून घेतली आणि कीटकनाशक मिश्रीत पाणी प्यायली. यानंतर या मुली बेशुद्ध झाल्या. पोलिसांनी शेतातून पाण्याची बाटली, स्नॅक्सची पाकिटं, सिगारेटचे खोके आणि पान मसालाचे काही पाऊच जप्त केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणीतील एक मुलगी जिवंत असून तिच्यावर उत्तम उपचार करून तिला वाचवण्याची मागणी होऊ लागली आहे. 

"उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा"; नितीन राऊतांची उत्तर प्रदेश सरकारला विनंती

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी देखील उन्नावमधील मुलीला मुंबईत उपचार करण्यासाठी एअरलिफ्ट करावे अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून उत्तम उपचारासाठी मुंबईत आणण्यात यावं अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. "आम्ही उन्नाव पीडितेला उत्तम वैद्यकीय उपचार देऊ आणि राज्य सरकार उपचाराचा सर्व खर्च उचलेल. देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी काही रुग्णालये मुंबईत आहेत. हे लक्षात घेता मुलीवर मुंबई उपचार झाले तर ते अधिक योग्य होईल" असं राऊत यांनी म्हटलं आहे.

"अत्यंत भयावह! योगीचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं, हे अत्याचार कधी थांबणार?"

आपचे नेते संजय सिंह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं आहे, उन्नावची घटना मन हेलावून सोडणारी आहे. हे अत्याचार कधी थांबणार?" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. या घटनेवरून राजकारण तापलं असून अनेकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

Web Title: unnao up police exposed minor girls murder case love affair gave pesticide mixed water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.