मंथ एनिव्हर्सरी साजरी न केल्याने नाराज, थेट आयुष्य संपवलं; एक महिन्यापूर्वीच केलेलं लव्ह मॅरेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:33 IST2026-01-06T12:30:54+5:302026-01-06T12:33:08+5:30
धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या लग्नाला कालच बरोबर एक महिना पूर्ण झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास विकास कॉलनीमध्ये एका नवविवाहितेचा मृतदेह संशयास्पद रितीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या लग्नाला कालच बरोबर एक महिना पूर्ण झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवास विकास येथील रहिवासी सूरज सिंह आणि जवळच राहणारी स्वेच्छा वर्मा यांच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. स्वेच्छाचे वडील मनोज वर्मा यांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता, त्यानंतर ती घरीच कॉस्मेटिकचं दुकान चालवून कुटुंबाला हातभार लावत होती.
हळूहळू सूरज आणि स्वेच्छा यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या ४ डिसेंबर २०२५ रोजी दोघांनी मोठ्या थाटामाटात लव्ह मॅरेज केलं होतं. मात्र लग्नाची पहिली 'मंथली एनिव्हर्सरी' स्वेच्छाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरेल, याची कोणालाही कल्पना नव्हती.
घटनेच्या रात्री म्हणजेच लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवशी स्वेच्छाने तिचा भाऊ वैभव वर्मा याला फोन करून काही सामान मागवलं होतं. मात्र काही वेळाने तिने सामान आणण्यास नकार दिला. असं असूनही वैभव केक आणि चॉकलेट घेऊन तिच्या सासरी गेला होता. वैभवच्या सांगण्यानुसार, त्यावेळी सर्व काही सामान्य वाटत होतं आणि स्वेच्छाने कोणत्याही त्रासाचा किंवा वादाचा उल्लेख केला नव्हता.
लग्नाचा पहिला महिना साजरा न केल्यामुळे नाराज होऊन तिने हे पाऊल उचललं की यामागे काही वेगळे कौटुंबिक कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दुसरीकडे मुलीच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर मानसिक छळ आणि हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.