"माझा मुलगा गेला, म्हातारपणात आधार..."; विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी आईचा प्रिन्सिपलवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:22 IST2026-03-24T11:21:51+5:302026-03-24T11:22:22+5:30

वाराणसीच्या यूपी कॉलेजमधील विद्यार्थी सूर्या सिंहच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता त्याची आई किरण सिंह यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

twist in varanasi up college student murder case surya pratap singh mother serious allegations against principal manjit chauhan | "माझा मुलगा गेला, म्हातारपणात आधार..."; विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी आईचा प्रिन्सिपलवर आरोप

"माझा मुलगा गेला, म्हातारपणात आधार..."; विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी आईचा प्रिन्सिपलवर आरोप

वाराणसीच्या यूपी कॉलेजमधील विद्यार्थी सूर्या सिंहच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता त्याची आई किरण सिंह यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. गाझीपूरमधील दुबैठा गावात 'आजतक'शी संवाद साधताना, मुलाच्या मृत्यूने खचलेल्या आईने कॉलेज प्रशासन आणि विशेषतः प्रिन्सिपलवर गंभीर कट रचल्याचा आरोप केला आहे. "आम्ही आमच्या मुलाला शिकण्यासाठी पाठवलं होतं, मात्र आता त्याचा मृतदेह आला" असं म्हणताना वडिलांनी टाहो फोडला.

सूर्याची आई किरण सिंह यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा गेल्या १०-१२ दिवसांपासून आजारी होता. कांजण्या आल्यामुळे तो घराबाहेरही पडत नव्हता. दरम्यान, कॉलेजच्या प्रिन्सिपलचा फोन आला आणि त्याला तातडीने कॉलेजला बोलावण्यात आले. तिथे गेल्यावरच त्याच्यासोबत ही भीषण घटना घडली. आईच्या दाव्यानुसार, सूर्या कॉलेजमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिथे हत्येचा कट रचण्यात आला होता. "प्रिन्सिपलने माझ्या मुलाला ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्याच वेळी आरोपी विद्यार्थ्यालाही तिथे बोलावलं. तो पिस्तूल घेऊन आला आणि त्याने माझ्या मुलावर गोळ्या झाडल्या" असं म्हटलं.

आरोपी विद्यार्थी मंजीत चौहान हा नशेत होता असा दावाही त्यांनी केला आहे. "तो बिअर पिऊन कॉलेजमध्ये आला होता आणि नशेतच त्याने माझ्या मुलाच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या झाडल्या. हे केवळ एका व्यक्तीचं काम नाही, यात आणखी लोक सामील आहेत. मारणारे दोन जण आहेत आणि प्रिन्सिपल सुद्धा त्यांच्यासोबत मिळालेले आहेत" असं किरण सिंह यांनी स्पष्टपणे सांगितलं.

रॅगिंगचा मुद्दा फेटाळून लावत आईने सांगितलं की, सूर्या स्वभावाने अतिशय मनमिळावू होता आणि सर्वांशी त्याचे चांगले संबंध होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कोलमडलेल्या मातेने भावूक होऊन विचारलं, "माझा मुलगा गेला, आता त्याला कोणीही परत आणू शकत नाही. म्हातारपणात आमचा आधार कोण असेल?" त्यांनी सरकार आणि प्रशासनाकडे न्यायाची याचना करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: twist in varanasi up college student murder case surya pratap singh mother serious allegations against principal manjit chauhan