५ दिवसांच्या पाठलागानंतर एन्काऊंटर; गुन्हा घडला तिथेच फिरत होता चिमुकलीवर अत्याचार करणारा, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:11 IST2025-11-28T12:08:29+5:302025-11-28T12:11:53+5:30
चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.

५ दिवसांच्या पाठलागानंतर एन्काऊंटर; गुन्हा घडला तिथेच फिरत होता चिमुकलीवर अत्याचार करणारा, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
MP Crime: मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात ६ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून फरार झालेल्या सलमान नावाच्या नराधमाला अखेर ५ दिवसांच्या पाठलागानंतर अटक करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून ३० हजार रुपयांचे इनाम असलेला आणि ३०० हून अधिक पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी गौहरगंज परिसरात एन्काऊंटरमध्ये जखमी झाला. पोलिसांनी आरोपी सलमानला रुग्णालयात दाखल केले आहे.
गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान गौहरगंजच्या कीरत नगर भागात लपून बसला होता. पोलिसांच्या विशेष पथकांनी त्याला भोपाळच्या वार्ड क्रमांक ११ मधील एका चहाच्या दुकानातून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी गौहरगंज पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस सलमानला रायसेन येथे घेऊन जात होते, तेव्हा भोजपूरजवळ त्याने पोलिसांच्या वाहनातून अचानक उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्याने उपनिरीक्षकाची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला.
रायसेन एसपी आशुतोष गुप्ता यांनी सांगितले, "आरोपीने गोळीबार केल्यानंतर, आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. यात सलमानच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला." जखमी अवस्थेतील सलमानला तातडीने भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी सलमानच्या शोधात ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी असतानाही, तो गेल्या पाच दिवसांपासून त्याच परिसरात उघडपणे फिरत होता जिथे त्याने हा गुन्हा केला होता. बलात्कारानंतर सलमानचे दोन व्हिडिओ समोर आले होते, ज्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पहिल्या व्हिडिओत आरोपी एका ट्रॅक्टर चालकाला रस्ता सांगताना दिसला होता. दुसऱ्या व्हिडिओत तो एका स्थानिक दुकानातून सिगारेट खरेदी करताना कॅमेरात कैद झाला होता.
हे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस दलावर प्रचंड दबाव वाढला होता. शुक्रवारी संध्याकाळी ही अमानुष घटना घडली होती. ६ वर्षांची पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना, २३ वर्षीय आरोपी सलमानने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि आपल्यासोबत जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि पसार झाला. मुलीच्या तक्रारीनंतर आणि वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लोक रस्त्यावर उतरून आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करत होते. अखेर ५ दिवसांच्या थरारानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.