लॉकडाऊनमध्ये चोरटे सक्रीय; शोरूम फोडून १३ लाखाच्या एलईडी टीव्ही पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:11 IST2020-05-27T17:11:10+5:302020-05-27T17:11:48+5:30
चोरट्यांनी या दालनाशेजारील बिअर बारचे तीन शटर उचकटवून चोरीचा प्रयत्न केला असून मोंढा नाका येथील देशी दारू चे दुकान फोडल्याचे उघडकीस आले आहे.

लॉकडाऊनमध्ये चोरटे सक्रीय; शोरूम फोडून १३ लाखाच्या एलईडी टीव्ही पळविल्या
औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील अपना बाजार मार्केटमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दालन फोडून चोरट्यांनी सुमारे १३ लाखाच्या तब्बल २५ एलईडी टीव्ही चोरून नेल्या. तसेच या दालनाशेजारील बिअर बार चे तीन शटर उचकटवून चोरीचा प्रयत्न केला असून मोंढा नाका येथील देशी दारू चे दुकान फोडल्याचे उघडकीस आले आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की , जालना रोडवरील अपना बाजार शॉपिंग कॉंप्लेक्स मधील चार गाळ्यात लकी दुमडा यांच्या मालकीची प्रतिक मार्केटिंग नावाचे इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दालन आहे. एलईडी, फ्रीज, वाशिंग मशिन आणि एंसीसह अन्य वस्तू या दालनात आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांपासून या दालनाला कुलूप आहे . दालनमालक दुमडा हे रोज सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान दालनाला भेट देऊन दालनाच्या शटर चे कुलूप जैसे थे आहेत का हे पहात असत. नेहमीप्रमाणे आज बुधवारी सकाळी दुमडा यांनी दालन गाठले तेव्हा त्यांना दालनाचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांना दिसले .
या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ जवाहरनगर पोलिसांना कळविली . यानंतर पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे , सहायक आयुक्त रवींद्र साळोखे , पोलीस निरीक्षक संतोष पाटील , पोलीस उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तीन ते चार छोट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. यानंतर डिस्प्लेसाठी लावलेल्या २२ ते २५ एलईडी टीव्ही चोरून नेल्याचे समजले. या एलईडी टीव्हीची १२ ते १३ लाख रुपये किम्मत असावी असे दुकानमालक यांनी पोलिसांना सांगितले . याविषयी जवाहरनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यानी सोबत आणलेल्या छोटा हत्ती वाहनातून माल नेला असे समोर आले आहे.