धक्कादायक! शहरात जाऊन शिकण्याची इच्छा; मुलीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:16 IST2026-02-10T16:13:57+5:302026-02-10T16:16:09+5:30
कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

AI फोटो
कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार केली की, कॉलेजला जात असताना काही लोकांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि तिला जखमीही केलं. प्रकरणाचं गांभीर्य पाहून स्थानिक आमदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात भरती असलेल्या विद्यार्थिनीला भेटायला पोहोचले. मात्र पोलीस तपासात हे संपूर्ण प्रकरण एक खोटी गोष्ट असल्याचं समोर आलं.
सुरुवातीला विद्यार्थिनीने दावा केला होता की, कारची नंबर प्लेट कपड्याने झाकलेली होती आणि त्यात तीन मास्क लावलेले लोक होते. अपहरणकर्ते तिची बॅग हिसकावून घेऊन गेले. पोलिसांनी या दाव्यांच्या आधारे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु कोणत्याही संशयास्पद वाहनाचा किंवा हालचालीचा पुरावा मिळाला नाही. जेव्हा पोलिसांनी कारचा रंग, मॉडेल, रस्ता आणि घटनास्थळाबाबत सविस्तर विचारणा केली, तेव्हा विद्यार्थिनीच्या उत्तरांमध्ये विसंगती दिसून आली.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर विद्यार्थिनीने कबूल केलं की, कोणीही तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. हे संपूर्ण प्रकरण तिने स्वतः रचलं होतं. तिला ग्रामीण भागातील कॉलेज सोडून मंगळुरू शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु घरचे लोक त्यासाठी तयार नव्हते. याच कारणामुळे तिने ही गोष्ट रचली, जेणेकरून घाबरून कुटुंबियांनी तिला दुसऱ्या कॉलेजमध्ये पाठवावं.
तपासात असंही समोर आलं की, विद्यार्थिनीने स्वतःची पुस्तकं घराशेजारीच जाळली होती, पण पोलिसांना सांगितलं की अपहरणकर्त्यांनी ती नेऊन जाळली. अशा प्रकारे तिने आपला दावा 'खरा' दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आता या प्रकरणाकडे चुकीची माहिती देणं आणि खोटा गुन्हा दाखल करणं या अँगलने पाहत आहेत. विद्यार्थिनी अल्पवयीन आहे, त्यामुळे पुढील कारवाईत समुपदेशन आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असेल.