संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:04 IST2026-01-15T15:03:40+5:302026-01-15T15:04:35+5:30
पत्नी चार मुलांसह अचानक गायब झाल्याने हादरलेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलत सासरच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतले.

AI Generated Image
पती-पत्नीमधील वादातून एका व्यक्तीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. पत्नी चार मुलांसह अचानक गायब झाल्याने हादरलेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलत सासरच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतले. या भीषण प्रकारात तो ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
रणजीत नगर येथील रहिवासी असलेला रवि कुमार ऊर्फ पुष्पेंद्र हा व्यवसायाने रिक्षा चालक आहे. दीड महिन्यापूर्वी त्याची पत्नी ज्योती ही आपल्या चार मुलांना घेऊन घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. पत्नीचा पत्ता लागत नसल्याने रविने पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पत्नी सासरीच लपून बसली असावी, असा रविचा संशय होता.
सासरच्या दारात अग्नितांडव
बुधवारी दुपारी एकच्या सुमारास रवि दिल्ली दरवाजा येथील आपल्या सासरी पोहोचला. यावेळी त्याचे सासरचे लोक दुसऱ्या एका नातेवाईकाकडे मकर संक्रांतीनिमित्त गेले होते. रविने सोबत आणलेले ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि आग लावून घेतली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या रवीला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जयपूरला हलवण्यात आले आहे.
सासरच्या मंडळींचे गंभीर आरोप
या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. रवीच्या मेहुण्याने आणि मेहुणीने त्याच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. "रवि नेहमीच ज्योतीला मारहाण करायचा, त्याच्या त्रासाला कंटाळूनच ती घर सोडून निघून गेली असावी," असा दावा मेहुणी ममताने केला आहे. त्याने आधीही सासरच्यांना "ज्योतीचा पत्ता सांगा, नाहीतर तुमच्या दारात स्वतःला पेटवून घेईन," अशी धमकी दिली होती, असेही त्याच्या सासरच्यांनी सांगितले.
४ चिमुकल्यांचे भविष्य अंधारात
रवि आणि ज्योती यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यातील सर्वात लहान मुलगा अवघ्या ४ वर्षांचा आहे. आई बेपत्ता आणि वडील मृत्यूशी झुंज देत असल्याने या चार चिमुकल्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून ज्योती नक्की कुठे गेली, याचा शोध घेत आहेत.