शाळेतील चार मुलींवर शिक्षकाकडून अत्याचार; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना, शिक्षकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:43 IST2026-02-13T06:41:33+5:302026-02-13T06:43:52+5:30
मुलीने हा प्रकार आईला सांगितला. नंतर पालकांनी चौकशी केली असता त्याने चार मुलींशी असेच गैरवर्तन करून अत्याचार केल्याचे समोर आले.

शाळेतील चार मुलींवर शिक्षकाकडून अत्याचार; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना, शिक्षकाला अटक
श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) : शहरातील एका शाळेतील शिक्षकाने आठ वर्षीय चार विद्यार्थिनींशी शाळेत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या शिक्षकावर बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या (पोक्साे) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली आहे. घटनेचा विविध स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
सचिन महाजन गोणारकर (वय ३५, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, ह. मु. वॉर्ड क्र. ७, श्रीरामपूर) असे शिक्षकाचे नाव आहे. बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला व लागलीच त्याला अटक झाली. सदर शिक्षक १ ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेवर नियुक्त झाला होता. तो शिकवत असलेल्या वर्गातील इयत्ता दुसरीतील एका विद्यार्थिनीशी त्याने वर्ग भरलेला असताना वर्गातील मागील बाकावर बसून गैरवर्तन केले.
मुलीने हा प्रकार आईला सांगितला. नंतर पालकांनी चौकशी केली असता त्याने चार मुलींशी असेच गैरवर्तन करून अत्याचार केल्याचे समोर आले. याचा जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळा गाठली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकाराची माहिती दिली.
शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचा गैरफायदा
संबंधित शाळेमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही इमारतीमधील रंगाच्या कामामुळे तात्पुरते बंद करण्यात आले होते. आरोपी शिक्षकाने त्याचाच गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे.
एकाच संस्थेतील दुसरी घटना : याच संस्थेच्या एका शाळेतील शिक्षकाच्या घरी माजी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. त्या प्रकरणातील शिक्षकाची केवळ बदली करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता याच संस्थेच्या दुसऱ्या शाळेतील घटना समोर आली आहे.