उंची परदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:49 IST2019-06-17T20:48:35+5:302019-06-17T20:49:11+5:30
पब व पंचतारांकित हॉटेलमध्ये परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्रीचा धंदा राजरोजपणे सुरु ठेवला होता़...

उंची परदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा हस्तगत
पुणे : उच्च प्रतीच्या परदेशी सिगारेटचा साठा बाळगणाऱ्या तिघा जणांना खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ९ लाख रुपयांच्या बेकायदेशीर सिगारेटी जप्त केल्या आहेत़. शहरातील पब आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये ते या सिगारेटची विक्री करीत असत़.
उमर फाऊख शेख (वय ४०), महंमद आफजल युसुफ (वय २०) आणि हिदायतुल्ला खुशमुदुल्ला खान (वय ४०, सर्व रा़ लाल देऊळ सोसायटी, लष्कर) अशी या तिघांची नावे आहेत़.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांना लाल देऊळाच्या मागे असलेल्या सोसायटीतील एका छोट्या खोलीत बेकायदेशीर सिगारेटचा साठा ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा घालून सिगारेटचा मोठा साठा जप्त केला आहे़. शासनाच्या निर्णयानुसार सिगारेटच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर धोक्याचा वैधानिक इशारा छापण्याचे बंधन घालण्यात आले आहे़. यातील सिगारेटवर असा कोणताही वैधानिक इशारा छापण्यात आलेला नाही़. या सर्व सिगारेट परदेशातून आयात करण्यात आल्या आहेत़. या तिघांवर जाहिरातीस प्रतिबंध व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण अधिनियम सन २००३ व २००४चे कलमानुसार खटला दाखल करण्यात आला असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र मोहिते यांनी दिली़.
उमर फाऊख शेख याच्यावर एक वर्षापूर्वी अशाच प्रकारच्या सिगारेटचा बेकायदेशीरपणे साठा केल्याबद्दल अन्न व औषध विभागाने कारवाई केली होती़. त्यानंतर त्याने जागा बदलून पुन्हा पब व पंचतारांकित हॉटेलमध्ये परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्रीचा धंदा राजरोजपणे सुरु ठेवला होता़.