मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं, रेल्वेच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 21:35 IST2020-03-02T21:32:45+5:302020-03-02T21:35:10+5:30
तीन दिवसानंतर पटली ओळख : मृत तरुण खामगावचा

मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं, रेल्वेच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू
जळगाव - सिग्नल मिळत नसल्याने एक्सप्रेस गाडी आऊटरवर थांबली, त्यामुळे खाली उतरुन मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या तरुण विनोद सोनी (२२, रा. किसन नगर, खामगाव, जि.बुलडाणा) या विद्यार्थ्याला दुसऱ्या रुळावरुन आलेल्या गोदान एक्सप्रेसचा धक्का लागल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुसखेडाजवळ घडली. सोमवारी या विद्यार्थ्याची ओळख पटली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण सोनी हा विद्यार्थी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. २९ रोजी हिसार एक्सप्रेसने पुणे येथे जात असवताना सिग्नल न मिळाल्याने ही गाडी दुसखेडा शिवारात खांब क्र.४५०/३२/३१ जवळ थांबली. त्यामुळे तरुण हा गाडीच्या खाली उतरुन मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना दुसऱ्या रुळावरुन भरधाव वेगाने आलेल्या गोदान एक्सप्रेसचा तरुणला धक्का बसला. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलाचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला. तेव्हा त्याची ओळख पटलेली नव्हती.
पोलिसांची धडपळ आणि बॅँक अधिकाऱ्याचे सहकार्य
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बाबुलाल खरात तसेच कॉ.नीलेश कुसराम यांनी मयताची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड तसेच पॅन कार्ड मिळाले. पॅन कार्डावरून त्याची ओळख पटली नाही. सोमवारी पोलिसांनी भुसावळ येथे बॅँक ऑफ बडोदा शाखेत धाव घेतली. व्यवस्थापकाला एटीएम कार्ड देऊन या तरूणाचा पत्ता शोधण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संगणकावर तपासले असता तरुण विनोद सोनी असे त्या मुलाचे नाव व तो खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.
एकुलता मुलगा गेल्याने प्रचंड आक्रोश
लोहमार्ग पोलिसांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तरूण याच्या अपघाताची व त्याच्या घराचा पत्ता सांगितला. तेथील पोलिसांनी सोनी याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानुसार दुपारी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठले. मुलाचा मृतदेह पाहताच कुटुंबाने एकच आक्रोश केला. तरूण हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडिल व बहिण (१६) असा परिवार आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी नातेवाईक मृतदेह घेऊन खामगावकडे रवाना झाले.