नोएडात कोरियन प्रियकराची लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या; स्वतः दवाखान्यात घेऊन गेली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:20 IST2026-01-05T12:47:03+5:302026-01-05T13:20:27+5:30
नोएडात एका परदेशी नागरिकाची त्याच्याच प्रेयसीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नोएडात कोरियन प्रियकराची लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या; स्वतः दवाखान्यात घेऊन गेली अन्...
Noida Crime: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका हाय-प्रोफाईल सोसायटीत सुरू असलेल्या दोन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा अत्यंत भीषण अंत झाला. ग्रेटर नोएडामधील एटीएस पायस हाइडवे सोसायटीत एका दक्षिण कोरियन नागरिकाची त्याच्याच प्रेयसीने चाकू भोसकून हत्या केली. मद्यपानानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
मूळचे दक्षिण कोरियाचे रहिवासी असलेले ४७ वर्षीय डक जी यू हे गेल्या १० वर्षांपासून भारतात वास्तव्यास होते. ते एका नामांकित मोबाईल कंपनीत ब्राँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांपासून ते मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लुंजेना पामाई हिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. ४ जानेवारीच्या रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये ओली पार्टी सुरू होती. मात्र, दारूच्या नशेत असतानाच दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात लुंजेना हिने किचनमधील चाकू आणून थेट डक जी यू यांच्या छातीत खुपसला. डक रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून लुंजेना घाबरली. ती स्वतः त्यांना गंभीर जखमी अवस्थेत ग्रेटर नोएडातील जिम्स रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी डक यांना मृत घोषित केले आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
आरोपी तरुणीची कबुली आणि धक्कादायक खुलासा
नॉलेज पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, लुंजेना तिथेच होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला. लुंजेनाने पोलिसांना सांगितले की, डक अनेकदा मद्यधुंद अवस्थेत तिच्याशी भांडण करायचा आणि तिला मारहाण करायचा. घटनेच्या रात्रीही डकने तिला मारहाण केली होती, त्यामुळे रागाच्या भरात तिने चाकू उचलला. मला त्याला जीवे मारायचे नव्हते, पण रागाच्या भरात हे घडले," असा दावा तिने केला.
पोलिसांची कारवाई
नॉलेज पार्क पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले असून फ्लॅटमधील रक्ताचे डाग आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. एका परदेशी नागरिकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आले आहे.