धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:51 IST2025-12-28T14:51:10+5:302025-12-28T14:51:58+5:30
एक अत्यंत वेदनादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. हरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिया कला येथील प्रसिद्ध महामाई मंदिर परिसरात रविवारी सकाळी एका नवविवाहित जोडप्याचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, याच मंदिरात दोघांनी अवघ्या २२ दिवसांपूर्वी सप्तपदी घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. आता त्याच पवित्र ठिकाणी पती-पत्नीने एकाच दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
लहरपूर येथील बस्ती पुरवा रहिवासी खुशीराम (२२) आणि त्याची पत्नी मोहिनी (१९) यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुशीराम आणि मोहिनी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही दूरचे नातेवाईक होते आणि त्यांना एकमेकांसोबत आयुष्य जगायचं होतं, परंतु सुरुवातीला दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरोध होता. कौटुंबिक विरोधानंतरही ६ डिसेंबर रोजी दोघांनी घरातून बाहेरपडून हरगावच्या महामाई मंदिरात रितीरिवाजानुसार प्रेमविवाह केला होता.
सर्वांनाच मोठा धक्का
लग्नानंतर काही दिवस दोन्ही कुटुंबांत तणाव आणि नाराजीचे वातावरण होतं. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काळानुसार परिस्थिती सामान्य होऊ लागली होती आणि कुटुंबीय हे नातं स्वीकारण्यास तयार झाले होते. विवाहानंतर खुशीराम आपली पत्नी मोहिनीसह लहरपूर येथील स्वतःच्या घरी कुटुंबासोबत राहत होता. वरवर सर्व काही सामान्य दिसत असताना, अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
एकाच दोरीला लटकलेले मृतदेह
रविवारी पहाटे जेव्हा ग्रामस्थ पूजेसाठी महामाई मंदिरात पोहोचले, तेव्हा तिथले दृश्य पाहून एकच खळबळ उडाली. मंदिर परिसरातील एका जुन्या झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने पती-पत्नीचे मृतदेह लटकलेले होते. पाहता पाहता घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि पूर्ण अनिया कला गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती हरगाव पोलीस ठाण्याला दिली.
काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हरगावचे पोलीस निरीक्षक बळवंत शाही यांनी सांगितलं की, मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश होता. लग्नानंतर अवघ्या २२ दिवसांत असं काय घडलं की या नवविवाहित जोडप्याला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागले, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.