Shocking! Use of used masks for mattresses; Filed a Case | धक्कादायक! वापरलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर; गुन्हा दाखल

धक्कादायक! वापरलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर; गुन्हा दाखल

ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांनी  महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर) यास अटक केली आहे. 

जळगाव : कोरोनापासून संरक्षण  मिळावे म्हणून वापरण्यात आलेल्या मास्कचा चक्क गादीसाठी वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी कुसुंबा नाका येथे उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी  महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर) यास अटक केली आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. जळगाव जिल्हा त्यात हाॅटस्पाॅट ठरलेला आहे. अनेक लोकांचा रोज त्यात जीव जात आहे. रुग्णालये फुल्ल झाले असून बेड मिळत नाही. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन लाॅकडाऊन लागू करीत असून मास्क सक्तीचा करण्यात आला आहे, असे असतानाही लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या मास्कपासून अमजद मन्सुरी याने चक्क गादी बनविण्याचा उद्योग सुरू केला.

 कुसुंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे महाराष्ट्र गादी भांडार येथे या मास्कपासून गादी बनविण्यात येत असल्याची माहिती कुसूंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्‍वर डापकर, शांताराम पाटील यांनी महाराष्ट्र गादी भांडार गाठले. याठिकाणी पाहणी केली असता, मिळालेल्या माहितीनुसार गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मास्क पडलेले दिसून आले. याबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी यास विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मालक अमजद मन्सुरी यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सिध्देश्‍वर डापकर यांनीच सरकारकडून फिर्याद दिली. तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत

Web Title: Shocking! Use of used masks for mattresses; Filed a Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.