धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:42 IST2026-01-13T13:41:43+5:302026-01-13T13:42:40+5:30
सुरेश एका मुलीच्या प्रेमात होता. दोघेही नात्यात असले तरी त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. सुरेशच्या आई-वडिलांनी त्याला अनेकदा समजावलं होतं. मात्र....

AI Generated Image
प्रेमात आंधळं होऊन टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो, पण राजस्थानच्या जालोरमध्ये एक असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल. "मी चालले, आता खुश राहा," असा प्रेयसीचा मेसेज पाहून प्रियकराला वाटलं की ती आत्महत्या करणार आहे. याच धक्क्यात त्याने स्वतःच गळफास घेऊन जीवन संपवलं. विशेष म्हणजे, या मृत्यूचं गूढ तब्बल दीड महिन्यानंतर एका सुसाईड नोटमुळे उघड झालं आहे.
गळफास घेतला, पण कारण होतं गुलदस्त्यात
२९ नोव्हेंबर २०२५ रोजी आहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदन गावात २१ वर्षीय सुरेश कुमार मेघवाल या तरुणाचा मृतदेह घराच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. घरच्यांनाही सुरेशने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, हे समजत नव्हतं. मात्र, दीड महिन्यानंतर सुरेशचे वडील कपाट आवरत असताना त्यांना मुलाने लिहिलेलं एक पत्र सापडलं आणि या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं.
प्रेयसीने पाठवला 'विषाच्या बाटली'चा फोटो
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेश एका मुलीच्या प्रेमात होता. दोघेही नात्यात असले तरी त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. सुरेशच्या आई-वडिलांनी त्याला अनेकदा समजावलं होतं. मात्र, त्या दिवशी प्रेयसीने सुरेशला व्हॉट्सॲपवर एक फोटो पाठवला. तो फोटो एका विषाच्या बाटलीचा होता. सोबत मेसेज होता- "बाय-बाय डिकू, खुश रहना... मी तुला खूप त्रास देते ना? आता तुला जे योग्य वाटेल ते कर, जेव्हा मीच राहणार नाही..." हा मेसेज वाचून सुरेशला वाटलं की आपल्या प्रेयसीने विष प्राशन केलं आहे किंवा ती आत्महत्या करणार आहे. याच तणावातून त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं.
सुसाईड नोटमधील 'तो' शेवटचा निरोप
कपाटात सापडलेल्या पत्रात सुरेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलंय, "तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. मी तुला पत्नी मानलं होतं आणि तुझ्यासोबत संसाराची अनेक स्वप्नं पाहिली होती. तुझ्याशी बोलणं न झाल्यामुळं मी रात्री-रात्री रडायचो. पण आता काही हरकत नाही माझ्या जीवा... मी आता अलविदा म्हणतोय. गुड बाय माय लव्ह!"
वडिलांनी केली तक्रार; प्रेयसीवर गुन्हा
मुलगा गेल्यानंतर दीड महिन्याने हे सत्य समोर आल्यावर सुरेशच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे. प्रेयसीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी एफआयआर दाखल केला आहे. सुरेशच्या आईनेही यापूर्वी त्या मुलीच्या घरी जाऊन सुरेशला संपर्क न करण्याची विनंती केली होती, मात्र तरीही मुलीने सतत मेसेज करून त्याला मानसिक त्रासात ढकलल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.