धक्कादायक! सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:55 IST2022-01-07T17:54:44+5:302022-01-07T17:55:34+5:30
Crime News : फैजपूरातील धक्कादायक घटना; कारण अस्पष्ट

धक्कादायक! सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही केली आत्महत्या
फैजपूर जि. जळगाव : सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही गळफास घेवून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता फैजपूर (ता. यावल) येथील बसस्थानकाच्या मागे असलेल्या आराधना कॉलनीत घडली.
निलेश घनश्याम बखाल (३३, रा. विवरे ता. रावेर) तर आर्यन बखाल अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमागील कारण अस्पष्ट आहे
नीलेश बखाल हे पत्नी व सहा वर्षीय मुलगा आर्यनसह फैजपूर येथील आराधना कॉलनी (मिरची ग्राऊंड) येथे वास्तव्यास आहेत. नुकतीच त्यांनी सावदा रस्त्यावर ती डेअरी सुरू केली होती.
शुक्रवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास किराणा आणण्यासाठी त्यांनी पत्नीला बाजारात सोडले आणि ते घरी परतले. घरी परतल्यावर त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर मुलगा आर्यन याला गळफास दिला नंतर स्वतः सुद्धा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नीलेश यांची पत्नी घरी परतल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी नीलेश व मुलगा आर्यन हे दोघे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. शेजारच्यांनी दोघांना खाली उतरवले तर मुलगा आर्यन याला खासगी रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ललित विलास जावळे यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे