धक्कादायक! पाणी सांगून सिद्यार्थ्याला शिक्षकाने पाजली दारू, बेशुद्ध अवस्थेत केलं रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 21:55 IST2022-01-06T21:50:32+5:302022-01-06T21:55:56+5:30
Crime News : या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे.

धक्कादायक! पाणी सांगून सिद्यार्थ्याला शिक्षकाने पाजली दारू, बेशुद्ध अवस्थेत केलं रुग्णालयात दाखल
सूरजपूर - छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्याला पाणी असल्याचं सांगत जबरदस्तीनं दारू पाजल्याचा गंभीर घटना घडली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या तब्येतीवर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे. दारू प्यायल्यामुळे विद्यार्थी बेशुद्ध पडला. हरिलाल कुर्रे नावाचा हा शिक्षक स्वतः वर्गात दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेतच तो वर्गावर आला आणि विद्यार्थ्यांना काहीही बोलू लागला. शिक्षकाने दारू प्यायली आहे, हे विद्यार्थ्यांनाही समजलं आणि ते त्याची गंमत पाहत होते.
याच दरम्यान शिक्षकाने त्याच्या वर्गातील एका मुलाला उभं केलं आणि जवळ बोलावलं. त्याला स्वतःकडची दारू पाणी म्हणून पिण्यास सांगितली. त्याने पिण्यास सुरुवातीला नकार दिला. त्यावर हे पाणीच आहे आणि ते तू प्यायलंच पाहिजेस, अशी सक्ती करत त्याच्या तोंडात अक्षरशः दारू ओतली.
या प्रकाराने विद्यार्थी बेशुद्ध पडला आणि वर्गात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी बेशुद्ध झाल्याची बातमी शाळेत वाऱ्यासारखी पसरली आणि शाळेतील इतर शिक्षकांनी त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. काही वेळाच्या उपचारानंतर विद्यार्थ्याला शुद्ध आली आणि त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या प्रकारामुळे सर्वांनाच जबर धक्का बसला. शिक्षकावर शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली असून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.