"चोराला शोधून बक्षीस देईन..."; भाजपा नेत्याच्या घरी AC ची चोरी झाल्याने काँग्रेस आमदार खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:45 IST2026-02-09T11:44:25+5:302026-02-09T11:45:09+5:30
मध्यप्रदेशातील श्योपूर येथील काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांनी भाजपा नेत्याच्या घरी झालेल्या चोरीबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे.

फोटो - आजतक
मध्यप्रदेशातील श्योपूर येथील काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांनी भाजपा नेत्याच्या घरी झालेल्या चोरीबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. आपले कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपाचे माजी आमदार दुर्गालाल विजय यांच्या घरी झालेल्या चोरीमुळे आमदार महोदय इतके आनंदात आहेत की, आता ते त्या चोराला शोधून 'बक्षीस' देण्याबाबत बोलत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर ताशेरे ओढताना आमदार बाबू जंडेल यांनी चोराला चक्क 'धन्यवाद' म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी पहाटे कोतवाली पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या भाजपाचे माजी आमदार दुर्गालाल विजय यांच्या घरी चोरी झाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोराने घराबाहेर लावलेले AC चे आऊटडोअर युनिट चोरून नेले.
चोरीच्या या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी भाजपा नेत्याच्या घरी हात साफ करणाऱ्या चोराचे आभार मानले. इतकंच नाही तर "अशा चोराला मी बक्षीस देईन" असं विधानही त्यांनी केलं.
माजी आमदार दुर्गालाल विजय यांनी ही एक किरकोळ घटना असल्याचं सांगत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या घरी काम करणाऱ्या रामू सुमन या कर्मचाऱ्याने सांगितलं की, रात्री उशिरा चोरांनी घराच्या मागच्या बाजूने प्रवेश करून ही चोरी केली. माझी ड्युटी संपल्यानंतर ही घटना घडली. सध्या माजी आमदारांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस चोराचा शोध घेत आहेत.