लोन ॲपच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्यांना बेड्या

By सागर दुबे | Published: May 13, 2023 11:14 PM2023-05-13T23:14:31+5:302023-05-13T23:14:59+5:30

सायबर पोलिसांची कारवाई; २ लाखांची रक्कम तक्रारदाराला केली परत

Shackles to those who extort money from doctors through loan app | लोन ॲपच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्यांना बेड्या

लोन ॲपच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्यांना बेड्या

googlenewsNext

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: ३५ बोगस चिनी लोन ॲप इन्स्टॉल करायला सांगून पैशांची मागणी केलेली नसताना सुध्दा लोन स्वरूपात ६ लाखाची रक्कम पहुर येथील डॉ.जितेंद्र वानखेडे यांच्या बॅंक खात्यात पाठविली. त्यानंतर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी देवून डॉक्टराकडून ४ लाख २३ हजार ७१९ रूपये उकळणा-या सायबर ठगांच्या गँगच्या सायबर पोलिसांनी बंगलुरू (कर्नाटक) येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून २ लाख रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली असून ती रक्कम डॉक्टराला परत करण्यात आली आहे.

डॉ. जितेंद्र वानखेडे यांना ९ जुलै २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सायबर ठगांनी संपर्क साधून ३५ चिनी लोन ॲप इस्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वानखेडे यांच्या मोबाईलमधील संपूर्ण डाटा चोरून घेतला. त्यानंतर पैशांची मागणी केलेली नसताना सुध्दा ठगांनी वानखेडे यांच्या बँग खात्यामध्ये लोन स्वरूपात ६ लाख ८ हजार रूपये पाठविले. नंतर त्यांना ठगांनी लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जीवे ठार मारण्याची धमकी देवून अधिक पैशांची मागणी केली. पैसे पाठविले नाही म्हणून ठगांनी बदनामीकारक संदेश वानखेडे यांच्या नातेवाईक व परिचयांना पाठविण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांनी उसनवारीने पैसे घेवून ठगांना ४ लाख २३ हजार रूपये पाठविले. मात्र, ठगांकडून पुन्हा पैशांची मागणी होत असल्यामुळे वानखेडे यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
---
संशयित निष्पन्न होताच गाठले बंगलुरू
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्यासह कर्मचा-यांनी डॉक्टराने दिलेले कागदपत्र व लोन ॲपची माहिती व ज्या बँक खात्यामध्ये रक्कम भरली, अशी सर्वांची माहिती घेवून तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित सायबर ठग हे बंगलुरू येथील असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दिप्ती अनफाट, दीपक सोनवणे, गौरव पाटील, अरविंद वानखेडे यांचे पथकाने बंगलुरू गाठून प्रवीण गोविंदराज (२८), सतिष पी (३०, दोन्ही रा. बंगलुरू) यांना अटक केली.
----
२ लाखाची रक्कम सुपूर्द
दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी २ लाख रूपयांची रक्कम काढून दिली. ही रक्कम शुक्रवारी पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्याहस्ते फिर्यादी डॉ. जितेंद्र वानखेडे यांना परत देण्यात आली. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांनी केले होते.

Web Title: Shackles to those who extort money from doctors through loan app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.