निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 10:28 PM2024-06-08T22:28:20+5:302024-06-08T22:33:03+5:30

देशात लोकसभा निवडणुकीसोबतच अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. लोकसभा निकालात नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. त्यांचा शपथविधी सोहळा रविवारी ९ जून रोजी होणार आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशात सत्ताबदल झाला आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी प्रचंड बहुमताने आंध्र प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकली आहे. १२ जून रोजी अमरावती येथे नायडू मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे अमरावतीकरांचे दिवस बदलले आहेत

गेल्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या पराभवानंतर आपलं वैभव आणि स्वप्ने गमावलेल्या या शहराच्या राजधानी होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे दर दुपटीने वाढले आहेत.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या विभाजनानंतरही दोन्ही राज्ये आपली राजधानी म्हणून हैदराबादचा वापर करत होती. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी अमरावतीचा आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून विकास करण्यास सुरुवात केली होती. या ग्रीन कॅपिटलच्या विकासामुळे २०१९ पर्यंत सगळीकडे प्रगती दिसू लागली.

पण, २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी हा प्रस्ताव रखडवला आणि अमरावती शहरानं त्याचं वैभव गमावले. मात्र विधानसभा निकालानंतर विजयवाडा आणि गुंटूर शहरांदरम्यान असलेल्या अमरावतीमधील जमिनीचे दर आता गगनाला भिडले आहेत.

TOI वृत्तानुसार, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अमरावतीमधील रिअल इस्टेटच्या किमती ५० ते १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांचं सरकार अमरावतीचा ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा पुढे नेईल, असं लोकांना वाटते. याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे हैदराबाद ही आता आंध्र प्रदेशची राजधानी राहिलेली नाही.

२०१९ मध्ये अमरावतीमधील जमिनीचे दर २५ ते ६० हजार रुपये प्रति चौरस यार्ड झाले होते. परंतु, जगन मोहन रेड्डी यांचं सरकार आल्यानंतर भाव ९००० ते १८ हजार रुपये प्रति चौरस यार्डपर्यंत घसरले. नायडू आल्यानंतर येथील दर गगनाला भिडू लागले आहेत. सध्या जमिनीचे भाव ३० हजार रुपयांवरून ६० हजार रुपये प्रति चौरस यार्ड झाले आहेत.

१२ जून रोजी होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात चंद्राबाबू नायडू पंतप्रधान मोदींसमोर अमरावतीबाबत मोठी घोषणा करू शकतात, अशी अमरावतीच्या जनतेला आशा आहे. त्यानंतर येथील जमिनीचे भाव आणखी वाढतील.

सध्या शैक्षणिक संस्था, उच्च न्यायालय, विधानसभा, सचिवालय आणि केंद्र सरकारच्या संस्थांच्या आजूबाजूला जमिनीची सर्वाधिक मागणी आहे. लोकांना केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही जमीन खरेदी करण्याच्या ऑफर येत आहेत.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात तेलगु देसम (TDP) ने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. टीडीपीने १३५ जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. तर जनसेनेला २१ जागा मिळाल्या. आठ जागा जिंकण्यात भाजपला यश आले. पण सत्ताधारी पक्ष असलेल्या YSR काँग्रेस पक्षाला केवळ ११ जागाच मिळवल्या