चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:42 IST2025-08-12T12:41:26+5:302025-08-12T12:42:02+5:30
हेल्मेट घालून आलेल्या ५ दरोडेखोरांनी २० मिनिटांपेक्षा कमी वेळात एका स्मॉल फायनान्स बँकेतून तब्बल १४ कोटींपेक्षा जास्त किमतीचं १४.८ किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड लुटली.

चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
जबलपूर जिल्ह्यात हेल्मेट घालून आलेल्या ५ दरोडेखोरांनी २० मिनिटांपेक्षा कमी वेळात एका स्मॉल फायनान्स बँकेतून तब्बल १४ कोटींपेक्षा जास्त किमतीचं १४.८ किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड लुटली. सोमवारी सकाळी खितौली परिसरातील या शाखेत बँक उघडली तेव्हा एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता.
जबलपूर ग्रामीण भागातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूर्यकांत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या सिहोर तहसीलमधील बँकेच्या शाखेतून दरोडेखोरांनी लॉकरमध्ये ठेवलेले १४.८७५ किलो सोनं आणि ५ लाख रुपयांची रोकड लुटली.
जबलपूर रेंजचे डीआयजी अतुल सिंह यांनी सांगितलं की, "दरोडा अवघ्या १८ मिनिटांत घालण्यात आला. दरोडेखोर दोन मोटारसायकलवरून आले आणि हेल्मेट घालून ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत घुसले. बँकेत सुरक्षा रक्षक नव्हता. घटनेच्या वेळी सहा कर्मचारी उपस्थित होते. दरोडेखोर सकाळी ८.५० वाजता शाखेत घुसले आणि सकाळी ९.०८ वाजता बाहेर आले. मोटारसायकलवरून पळून गेले."
"आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. त्यांच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं. दरोडेखोरांपैकी एकाने त्याच्या बेल्टखाली बंदूक लपवली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर घटनेच्या ४५ मिनिटांनी बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. जर त्यांनी आम्हाला वेळेवर माहिती दिली असती तर दरोडेखोरांना पकडता आलं असतं. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत."