स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली लूट, अखेर आरोपीला अटक
By सुरेश लोखंडे | Updated: May 27, 2023 18:56 IST2023-05-27T18:55:35+5:302023-05-27T18:56:08+5:30
ठाण्यात स्वस्तात सोने देण्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीने अनेकांना लुबाडले होते.

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली लूट, अखेर आरोपीला अटक
ठाणे : स्वस्तात सोने देण्याची बतावणी करीत 25 लाखांची लूट करणाऱ्या टोळीतील मोहरक्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ आशिष शिवाजी माने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ठाण्यात स्वस्तात सोने देण्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीने अनेकांना लुबाडले होते. या प्रकारचे वाढते गुन्हे राखण्यासाठी काही गुन्ह्यांचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याचा तपास करीत असतांना स्वस्तात सोने देण्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार भायखळा परिसरात राहत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शोध पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय उर्फ आशिष शिवाजी माने यास भायखळ्यातून अटक केली. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यास पुढील तपासकामी श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन त्याच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांनी दिली.