हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:25 IST2025-11-19T11:24:38+5:302025-11-19T11:25:53+5:30
लग्नात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. काही तरुण डीजेवर नाचत होते.

हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
राजस्थानच्या मुंडावर येथील जसाई गावात लग्नात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. काही तरुण डीजेवर नाचत होते. त्यापैकी एकाने आनंदाच्या भरात पिस्तूल काढलं आणि गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही गोळी नवरदेवाच्या मित्राची मुलगी वीरा हिच्या डोक्यात लागली. यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने तिला जयपूरमधील उच्च केंद्रात रेफर करण्यात आलं. रस्त्यातच वीराचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलीस अधिकारी महावीर सिंह शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील राजेश जाट याचं २२ नोव्हेंबर रोजी लग्न होणार आहे. या समारंभाची तयारी सुरू होती आणि लग्नापूर्वी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. राजेशचा मित्र सतपाल मीणा त्याची ६ वर्षांची मुलगी वीरासह या कार्यक्रमाला उपस्थित होता. समारंभादरम्यान पाच ते सात तरुण डीजेवर नाचत होते. ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. गोळीबार केल्यानंतर गोळी वीराला लागली.
जखमी वीराला तात्काळ उपचारासाठी नीमरानातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला जयपूरला रेफर करण्यात आलं. मात्र जयपूरला जाताना रस्त्यातच वीराचा मृत्यू झाला. वीराचे वडील सतपाल मीणा भिवाडी येथे वाहतूक विभागात अतिरिक्त प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात. वीराला एक मोठा भाऊ आणि एक धाकटी बहीण आहे.
वीराचे वडील सतपाल मीणा यांनी सांगितलं की, "घराच्या गेटजवळ डीजेवर गाणी वाजत होती. मी डीजेपासून थोडे अंतरावर उभा होतो, तर माझी मुलगी वीरा घराच्या अंगणात होती. अचानक मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर आतून ओरडण्याचा आवाज आला. सर्वजण ताबडतोब अंगणात धावले, जिथे वीरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. वीराचे मामा शिवकुमार यांनी सांगितलं की, डीजेवर नाचत असताना गोळीबार होत होता आणि एक गोळी मुलीच्या डोक्यात लागली." पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली