आधी वडिलांचा 40 लाखांचा विमा काढला, नंतर पैसे मिळवण्यासाठी केला निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:03 PM2021-12-27T16:03:41+5:302021-12-27T16:04:00+5:30

वडिलांच्या अपघाती विम्याचे पैसे मिळवण्यासाठी निर्दयी मुलाने मित्रांच्या मदतीने वडिलांच्या डोक्यात हातोड्याचे वार करुन निर्घृण खून केला. नंतर अपघात दाखवण्यासाठी मृतदेह रस्त्यावर फेकून दिला.

Rajasthan Crime news; Son brutally kills father to claim accidental insurance | आधी वडिलांचा 40 लाखांचा विमा काढला, नंतर पैसे मिळवण्यासाठी केला निर्घृण खून

आधी वडिलांचा 40 लाखांचा विमा काढला, नंतर पैसे मिळवण्यासाठी केला निर्घृण खून

googlenewsNext

भरतपूर:राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन परिसरात, विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मुलाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने वडिलांची हातोड्याचे वार करुन निर्घृण हत्या केली आहे. 24 डिसेंबरच्या रात्री आरोपींनी ही घटना घडवली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेले मोहकम डीग येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील नागला भधई गावचे रहिवासी होते. ते मागील काही दिवसांपासून आरोपी मुलगा राजेशसोबत फरीदाबाद येथे राहत होते. चार महिन्यांपूर्वी राजेशने वडील मोहकम यांचा चार वेगवेगळ्या बँकांमध्ये 40 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला होता. यानंतर आरोपीने विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एक कट रचला.

24 डिसेंबरला केला खून

24 डिसेंबर रोजी राजेश त्याच्या मित्रांसह वडिलांना सुनियोजित पद्धतीने घरी घेऊन येत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. संध्याकाळी वाटेत राजेशने वडील व त्याच्या साथीदारांना आधी दारू पाजली. त्यानंतर दीग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिडवली गावाजवळ संधी साधून साथीदारांसह वडिलांचा हातोड्याने वार करुन निर्दयीपणे खून केला. नंतर अपघात झाल्यासारखे वाटावे म्हणून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

असा झाला हत्येचा उलगडा

गुन्हा केल्यानंतर राजेश आणि त्याचे साथीदार दारुच्या नशेत रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरत होते. यादरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी तिन्ही आरोपींना शांतता भंग केल्याप्रकरणी अटक केली. 25 डिसेंबर रोजी सकाळी डिडवली गावाजवळ एक मृतदेह असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे पोलिसांना मिळाली. 

नातेवाइकांच्या माहितीवरून पोलिसांना या तरुणांवर संशय आला

अतिरिक्त पोलीस अधीक्षक बुगलाल मीना यांनी सांगितले की, पोलिसांनी मृतदेहाबाबत माहिती गोळा केली असता, आधारकार्डच्या आधारे ते नागला भधई गावचे रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली. यावेळी कुटुंबीयांनी पोलिसांना 40 लाख रुपयांच्या अपघाती विम्याबद्दल माहिती दिली.

आरोपींनी हत्येची कबुली दिली

यानंतर पोलिसांचा संशय अटक करण्यात आलेल्या तरुणांवर गेला. पोलिसांनी तिन्ही तरुणांची कसोशीने चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. आरोपींनी मोहकम यांच्यावर हतोड्याने वार करुन हत्या केल्याची कबुली दिली. अपघाती विम्याची रक्कम मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले.
 

Web Title: Rajasthan Crime news; Son brutally kills father to claim accidental insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.