घटस्फोटीत गर्लफ्रेंन्डचे ऐकलं अन् पत्नीला संपवलं; भाजप नेत्याचे कृत्य पाहून पोलिसांना शंका आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:03 IST2025-08-18T14:54:02+5:302025-08-18T15:03:32+5:30
राजस्थानमध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

घटस्फोटीत गर्लफ्रेंन्डचे ऐकलं अन् पत्नीला संपवलं; भाजप नेत्याचे कृत्य पाहून पोलिसांना शंका आली अन्...
Rajasthan Crime: राजस्थानमधील अजमेरमध्ये पतीने पत्नीच्या हत्येचे एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. भाजप नेत्याने गर्लफ्रेन्डच्या सांगण्यावरुन पत्नीची हत्या केल्याचे उघड झालं आहे. सुरुवातीला ही घटना दरोडा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासांत संपूर्ण प्रकरणाचे गूढ उकलले.
अजमेर येथील भाजप नेता रोहित सैनी याने त्याच्या घटस्फोटित प्रेयसीसाठी पत्नी संजू सैनीची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी रितू सैनीला अटक केली आहे. रोहित सैनीला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. ही घटना दरोड्याच्या घटनेसारखी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पोलिसांनी सगळं प्रकरण उघडकीस आणून आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितू सैनी ही रोहितला त्याच्या पत्नीची हत्या करण्यास भाग पाडत होती. रोहित आणि रितू सैनी यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जोपर्यंत पत्नीला सोडत नाही ती तोपर्यंत तुझ्यासोबत राहणार नाही असा दबाव रितू रोहितवर दबाव आणत होती. यामुळे रोहितने त्याच्या प्रेयसीसह पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी संजूची हत्या केली.
रोहित आणि रितूच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती होती. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना भेटण्यापासून आणि संबंध ठेवण्यापासून रोखले होते. पण त्यांनी भेटणे सुरूच ठेवले आणि संजूच्या हत्येची योजना आखली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या वेळी रितू तिथे उपस्थित नव्हती. ठरल्यानुसार, रोहितने संजूला तिच्या सासरच्या घरातून परतताना मारून टाकले. यानंतर त्याने पोलिसांना दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगितल्या. सासरच्या घरातून परतताना दोन लोकांनी चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि तिला मारहाणही केली. या घटनेनंतर पत्नीला नेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असं रोहितने सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. मात्र संजूच्या मृत्यूवरुन पोलिसांना संशय आला. त्यामुळे कसून तपास सुरु केला. चोरी करायला आलेला तरुण दागिने घेण्यासाठी आला होता तर त्याने गळ्यातील मंगळसूत्र का घेतले नाही अशी पहिली शंका पोलिसांना आली. त्यानंतर रोहित सैनी सतत त्याचा जबाब बदलत होता. त्यामुळे पोलिसांना दुसऱ्यांदा शंका आली. तसेच जर आरोपी आणि संजूमध्ये झटापट झाली असेल तर तिच्या अंगावर जखमांच्या खुणा का नव्हत्या अशी तिसरी शंका पोलिसांना आली. त्यामुळे पोलिसांनी रोहितची कसून चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आलं. रोहितने हत्येची कबुली दिली आणि रितूलाही अटक करण्यात आली.