पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:47 IST2026-01-04T09:44:28+5:302026-01-04T09:47:30+5:30
Pune Sadiq Kapoor Suicide : प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता.

पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद...
पुण्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच एका खळबळजनक घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप झाला आहे. सादिक उर्फ बाबू कपूर असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
लष्कर भागातील कार्यालयात संपवले जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, सादिक कपूर यांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधील लष्कर भागात असलेल्या आपल्या स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावर आणि एका कागदावर सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत त्यांनी हडपसरमधील उमेदवार फारुख शेख यांच्यासह इतरही काही जणांची नावे लिहिली असून, हे सर्वजण आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
५ गुंठे जमिनीचा वाद ठरला कारण?
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. या वादातूनच कपूर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. लष्कर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.
मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमी
आत्महत्या केलेले सादिक कपूर यांच्यावर यापूर्वी 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. एका बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि दुसऱ्या बाजूला थेट निवडणुकीतील उमेदवाराचे नाव आत्महत्येशी जोडले गेल्याने, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.