"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:17 IST2025-11-10T12:16:25+5:302025-11-10T12:17:22+5:30
महाराष्ट्रातील पुण्याच्या वारजे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
महाराष्ट्रातील पुण्याच्या वारजे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि सर्व पुरावे नष्ट केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वतःच ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर पतीनेच हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. अंजली समीर जाधव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी तिचा ४२ वर्षीय पती समीर पंजाबराव जाधव याला अटक केली आहे.
२८ ऑक्टोबर रोजी समीरने वारजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली पत्नी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. समीरने सांगितलं की, अंजली शेवटची शिंदेवाडी येथील गोगलवाडी फाटा येथील श्रीराम मिसाळ हाऊसच्या परिसरात दिसली होती. याच दरम्यान समीरचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटू लागलं. तक्रारीनंतर समीर वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन "माझी पत्नी सापडली का?" असा प्रश्न विचारत होता.
स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
पोलिसांनी सर्व ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु अंजली कुठेही सापडली नाही. समीर त्याचं म्हणणं वारंवार बदलत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, समीरने कबूल केलं की त्याला त्याच्या पत्नीचे सतेज पाटील नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. मोबाईलवरील चॅट्स पाहून ते दररोज भांडत असत. यामुळे त्याने एक महिना आधीपासूनच हत्येचा कट रचला.
सर्वांनाच मोठा धक्का
समीरने गोगलवाडी परिसरात महिन्याला १८,००० रुपयांना एक गोदाम भाड्याने घेतलं होतं. त्याने आधीच तेथे एक लोखंडी पेटी, लाकूड आणि पेट्रोल ठेवलं होतं. २६ ऑक्टोबर रोजी समीरने अंजलीला फिरायला जायचं असल्याचं सांगून घराबाहेर नेलं. ते खेडशिवापूरमधील मरीयी घाटावर गेले. परत येताना ते ब्राउनस्टोन हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबले आणि नंतर थेट गोदामात गेले. त्याने अंजलीचा गळा दाबला. मृतदेह एका लोखंडी पेटीत ठेवला, त्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावली. त्याने राख नदीत फेकली आणि लोखंडी पेटी भंगार म्हणून विकली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
‘आय लव्ह यू’ चा मेसेज..
आरोपी समीर याने त्याच्या एका मित्राला हैदराबाद येथे पाठवत तेथून स्वत:च्या पत्नीच्या मोबाईल नंबरवर ‘आय लव्ह यू्’ असा मेसेज करण्यास सांगितले. तसा मेसेज अंजलीच्या मोबाईलवर येताच, समिरने पत्नीच्या मोबाईलवरून ‘आय लव्ह यू टू्’ असा मेसेज त्या नंबरवर केला. त्यानंतर तो मेसेज वाचून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे नाटक करू लागला. दरम्यान, आरोपी समीर याचेच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची बाब देखील पोलीस तपासात आली असून, त्याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागल्याने समीरने पत्नीचा काटा काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
३ ते ४ वेळा पाहिला दृश्यम
ऐन दिवाळीच्या दरम्यान समीरने हे कृत्य केलं. समीर आणि अंजली यांना एक मुलगा व एक मुलगी असून, दिवाळीनिमित्त ते नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे समीर एकट्या अंजलीला घेऊन घटनेच्या दिवशी फिरायला गेला होता. दरम्यान, पोलीस तपासात त्याने दृश्यम हा चित्रपट ४ महिन्यांपूर्वी ३ ते ४ वेळा पाहिल्याचे देखील पोलिसांना सांगितलं.