कळमेश्वरमध्ये राजकीय राडा, भाजपचा प्रचार का करतो असे म्हणत तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:53 IST2025-11-24T22:52:33+5:302025-11-24T22:53:06+5:30
या प्रकरणात पोलिसांनी ग्लालबंशीविरोधात गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे.

कळमेश्वरमध्ये राजकीय राडा, भाजपचा प्रचार का करतो असे म्हणत तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण
नागपूर : कळमेश्वर नगरपालिका निवडणूकीत राजकीय प्रचारामुळे वातावरण तापले असतानाच राजकीय पक्षाचा प्रचार करण्यावरून राडा झाला. एका तरुणाचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी तरुणाने नागपुरात माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीने हे कृत्य केल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ग्लालबंशीविरोधात गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे.
आरिफ लतिफ शेख (४१, कळमेश्वर) असे जखमीचे नाव आहे. रविवारी रात्री आरिफला आशीष ग्वालबंशीचा फोन आला व हरीश ग्वालबंशीला भेटायला ये असे म्हटले. मात्र आरिफने जायला नकार दिला व तो दुसरीकडे जेवायला गेला. रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरिफ विसावा बारसमोर उभा राहून फोनवर बोलत असताना आतून आरोपी बाहेर पडले. त्यांनी शिवीगाळ करत लाठी, दगडांनी बेदम मारहाण केली. त्यांनी आरिफला कारमध्ये बसविले व नागपुरच्या दिशेने निघाले. गाडीतदेखील त्यांनी आरिफला मारहाण केली. फ्रेंड्स कॉलनी परिसरात पोहोचल्यावर आरिफला त्यांनी मारहाण करत सोडून दिले.
आरिफने मित्रांना या प्रकाराची माहिती दिली. त्याला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरीश ग्वालबंशी, राजेश उर्फ राजू सोनारे, अनिकेत अनिल उर्ईके (२८, मकरधोकडा), रोशन बबन यादव (३२, मकरधोकडा) व आशीष ग्वालबंशी (२५, मकरधोकडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अनिकेत, रोशन व आशीषला ताब्यात घेतले आहे. आरिफच्या दाव्यानुसार हरीश ग्वालबंशीने तू कॉंग्रेससाठी काम का करत नाही व भाजपला का पाठिंबा देत आहे असा सवाल करत मारहाण केली