मुलाला मारहाण करणाऱ्या पोलिसाला तीन वर्षे कारावास; दादरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:02 AM2021-10-20T08:02:19+5:302021-10-20T08:02:34+5:30

५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला

Police jailed for three years for beating a child | मुलाला मारहाण करणाऱ्या पोलिसाला तीन वर्षे कारावास; दादरमधील प्रकार

मुलाला मारहाण करणाऱ्या पोलिसाला तीन वर्षे कारावास; दादरमधील प्रकार

Next

मुंबई : स्कूटरवर टेकून उभा राहिल्याने चौदा वर्षीय मुलाला मारहाण करून त्याच्या नाका-तोेंडातून रक्त काढणाऱ्या ३७ वर्षीय निलंबित पोलिसाला न्यायालयाने तीन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. दादर बसस्टॉपजवळ २०१६ मध्ये ही घटना घडली.

एक मुलगा आपल्या स्कूटरवर टेकून उभा राहिल्याने आरोपी शैलेश कदम याने त्याच्या घरातील खिडकीतून पाहिले. खिडकीतूनच शैलेशने मुलावर ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो खाली आला आणि  मुलाला मारहाण करू लागला. ‘आरोपीने क्षुल्लक मुद्द्यावरून १४ वर्षीय मुलाला क्रूरपणे मारहाण केली. हे प्रकरण गंभीर आहे. कारण  आरोपी पोलीस आहे. असहाय्य नागरिक, मुले यांचे रक्षण करणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे,’ असे महानगर दंडाधिकारी प्रवीण देशमाने यांनी म्हटले.  तसेच दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. त्यापैकी २५ हजार रुपये  मुलाला मानसिक त्रासापोटी देण्याचे निर्देश दिले. 

दुखापतग्रस्त अल्पवयीन मुलगा आणि या घटनेचा साक्षीदार मुलाच्या मित्राने आरोपीला ओळखले. मुलाच्या वडिलांनीही न्यायालयात साक्ष दिली. अल्पवयीन मुलाने न्यायालयाला सांगितले की, तो २२ जानेवारी २०१६ रोजी दुपारी हिंदमाता बस स्टॉपवर होता. बस स्टॉपवर बसण्यासाठी जागा नसल्याने तो बाजूलाच असलेल्या स्कूटरला टेकून उभा राहिला. तेव्हा बस स्टॉपच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीतून आरोपीने मुलाला पाहिले तेव्हा तो त्याच्यावर ओरडला. आरोपी इमारतीच्या खाली आला आणि मुलाच्या कानशिलात लगावली आणि ठोसे लगावले. जेव्हा त्याच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपीने त्याचे तुकडे करण्याची धमकी दिली. मुलगा कसाबसा घरी पोहोचला आणि त्याने घडलेली घटना वडिलांना सांगितली. त्याच्या वडिलांनी याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदविला. आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर एका आठवड्यातच त्याची जामिनावरही सुटका झाली.

शिक्षेत दया दाखवण्यास नकार
सुनावणीदरम्यान आरोपीवर विनयभंगाच्या केसेस काही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. २०१५ मध्ये आरोपीने त्याच्या महिला सहकारीबरोबर गैरवर्तन केले आणि जुहू पोलीस ठाण्यात तमाशा केला. जुहू पोलीस ठाण्याच्या मालमत्तेचे नुकसान केले. वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकावण्यासाठी चाकू बाळगला. यावरून आरोपीची गुन्हेगारी वृत्ती असल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले. आरोपीचा आक्रमक स्वभाव आणि कलंकित चारित्र्य पाहता प्रतिबंधात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला शिक्षेत दया दाखवण्यास नकार दिला.

Web Title: Police jailed for three years for beating a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.