कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:36 IST2026-04-11T10:34:29+5:302026-04-11T10:36:08+5:30
'कस्टम ऑफिसर' असल्याचं खोटं सांगून आरोपींनी १४ किलो ९०० ग्रॅम सोनं लंपास केलं.

फोटो - आजतक
बिहारची राजधानी पाटणा येथे ४ एप्रिल रोजी एक खळबळजनक घटना उघडकीस आली होती. खगोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'कस्टम ऑफिसर' असल्याचं खोटं सांगून आरोपींनी १४ किलो ९०० ग्रॅम सोनं लंपास केलं होतं. या गुन्ह्यात एकूण ९ आरोपींचा सहभाग होता. आता या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि ५ किलोहून अधिक सोनं जप्त करण्यात आलं आहे.
सोन्याचे व्यापारी दानापूर स्टेशनवर उतरून तब्बल १५ किलो सोनं घेऊन टेम्पोने जात होता. त्याच वेळी एक कार टेम्पोसमोर येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या आरोपींनी आपण कस्टम ऑफिसर असल्याचं खोटं सांगून व्यापाऱ्याला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून सर्व सोनं लुटलं आणि एका निर्जन ठिकाणी व्यापाऱ्याला सोडून आरोपी पसार झाले.
पोलिसांची मोठी कारवाई
या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली. पाटणा एसएसपींच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली, तसेच एसटीएफ (STF) देखील तपासात सहभागी झाली. तपासाअंती पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून १ लाख ९७ हजार रुपये रोख आणि ५ किलो ४०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे.
दीड वर्षांपासून सुरू होती रेकी
पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीच्या गाडीचा वापर करून हा गुन्हा केला होता. धक्कादायक बाब म्हणजे, हे आरोपी गेल्या दीड वर्षांपासून संबंधित व्यापाऱ्याची रेकी करत होते. त्याच्यावर पाळत ठेवून होते.
५ किलो ४०० ग्रॅम सोनं जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमरनाथ उर्फ गोपी, आदित्य गिरी आणि संजय कुमार यांचा समावेश आहे. अमरनाथकडून ५ किलो ४०० ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. हे तिन्ही आरोपी पाटणा सिटीतील मेहंदीगंज आणि बायपास परिसरातील रहिवासी असून, त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यापूर्वीही ते जेलमध्ये जाऊन आले आहेत. सध्या इतर फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.