संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:29 IST2026-01-12T14:28:15+5:302026-01-12T14:29:21+5:30
आपल्या २० वर्षांच्या मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी दोघांना इतकी मारहाण केली की..

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या २० वर्षांच्या मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी दोघांचीही लाठ्या-काठ्यांनी मारून मारून हत्या केली. रविवारी रात्री घडलेल्या या 'डबल मर्डर'मुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सदर प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, हे भीषण हत्याकांड गढिया सुहागपूर गावात घडले. २५ वर्षीय दीपक आणि २० वर्षीय शिवानी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही एकाच गावातील आणि एकाच समाजातील होते. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दीपक गुपचूप शिवानीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. दोघेही घराच्या छतावर बसलेले असताना अचानक शिवानीच्या कुटुंबीयांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
काठ्यांनी केला खुनी हल्ला
आपल्या मुलीला प्रियकरासोबत पाहून शिवानीच्या कुटुंबीयांचा राग अनावर झाला. कोणताही विचार न करता त्यांनी दोघांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, शिवानीचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दीपकला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली. प्रेमाचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने गावात सगळेच हादरून गेले आहेत.
पोलीस कारवाई आणि अटक
घटनेची माहिती मिळताच एसएसपी श्याम नारायण सिंह यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी तत्परता दाखवत शिवानीच्या कुटुंबातील काही सदस्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
गावात पोलीस छावणीचे स्वरूप
एकाच वेळी दोन तरुणांचा बळी गेल्याने गावात पुन्हा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून रीतसर तक्रार दाखल झाली नसली, तरी पोलिसांनी स्वतःहून या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.