लाखोंचा आर्थिक गंडा घालणारी नायजेरीयन टोळी जेरबंद;सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 08:25 PM2020-06-16T20:25:06+5:302020-06-16T20:26:15+5:30

हर्बल ऑईलच्या नावाखाली २१ लाखांना घातला होता गंडा, ५ जणांना अटक

Nigerian gang arrested for fraud of millions | लाखोंचा आर्थिक गंडा घालणारी नायजेरीयन टोळी जेरबंद;सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

लाखोंचा आर्थिक गंडा घालणारी नायजेरीयन टोळी जेरबंद;सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Next
ठळक मुद्देअधिक तपासासाठी २०जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर

पुणे : हर्बल ऑईल व्यवसायाची ऑफर देऊन महिलेला २१ लाखांचा गंडा घालणाऱ्या नायजेरीन टोळीला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर येथून जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून २ लॅपटॉप,बनावट हर्बल ऑईलच्या ५बाटल्या, १६ मोबाईल, ३० हजार रुपये, डेबिड कार्ड असा ऐवज जप्त केला आहे.राधा नेल्सन कॅस्टन (वय३७, रा. हेलन हाऊस, जुहु, मुंबई), अलेक्सइलेचुकवु आरिन्झे ( वय ३३), ग्युयेड फ्रान्सिस (वय ३८), ओकोको ओकोरोन्वाआमामा (वय ३८), कालु ईलेचुकवु (वय २७, सर्व रा. खारघर, मुंबई, मुळ- नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली होती. या महिलेची टणटण या सोशल संकेतस्थळावर रोज नावाच्या महिलेशी ओळख झाली होती.रोज नाव सांगणाऱ्या महिलेने फियार्दीशी मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला जादा नफा कमविण्यासाठी हर्बल ऑईलचा व्यवसाय करण्याची ऑफर दिली. होणाऱ्या नफ्यामधून ४० टक्के नफा तिला देण्याची अट ठेवली. त्यानुसार व्यवसायाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणासाठी तिला वेळोवेळी २१ लाख २३ हजार ३२५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरायला सांगितले. आपली फसवणुक झाल्याचे या महिलेला लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच त्यांना एक महिला व्यवसायाच्या अनुषंगाने हर्बल ऑईलचे सॅम्पल बाटली घेऊन मुंबईहून पुण्यात येणार असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राधा नेल्सन कॅस्टन हिला पकडले. त्यांच्याकडून एक मोबाईल, २ बनावट हर्बल ऑईलच्या बाटल्या, डेबीट कार्ड जप्त करण्यात आले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिचे साथीदार खारघर येथे असल्याची माहिती मिळाली. तेथे पोलिसांनी आणखी ४ जणांना पकडले. या टोळीने भारतामध्ये अशा प्रकारे आणखी काही जणांना गंडा घातला असल्याची शक्यता आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी २०जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक अनिल डफळ, पडवळ, पोलीस नाईक दीपिका मोहिते,नितेश शेलार आदींनी केली.

Web Title: Nigerian gang arrested for fraud of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.