हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:00 IST2025-11-18T13:59:05+5:302025-11-18T14:00:23+5:30
लग्न मंडपात थेट नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाली आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न मंडपात थेट नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाली आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हापूरमधील मूंदाफरा गावातून लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात गावात आली. कुटुंबीयांनी पाहुण्याचं जोरदार स्वागत केलं. पण याच दरम्यान अचानक नवरदेवाची गर्लफ्रेंड लग्नमंडपात आली. "हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि आमचं आठ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे" असं सांगितलं.
गर्लफ्रेंडला पाहताच नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. "आठ वर्षांपासून मी तुझी कोण आहे?" मला वचन देऊन आज दुसरीशीच लग्न कसा करतोस? माझ्या अब्रूचं काय होईल?" असे प्रश्न गर्लफ्रेंडने नवरदेवाला विचारले. सुरुवातीला लग्नमंडपात हे काय चाललं आहे हे कोणालाही समजलं नाही. नंतर जेव्हा वाद-विवाद सुरू झाला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.
तरुणीला नवरीकडच्या लोकांनी सपोर्ट केला आणि नवरदेवाकडे या प्रश्नांची उत्तरं मागितली. या घटनेने नवरीला मोठा धक्का बसला आहे. नवरदेवाने स्वत:ची बाजू सावरण्याचा खूप प्रयत्न केला. तरुणीशी संबंध नसल्याचं म्हटलं. पण गर्लफ्रेंडने गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम असल्याचं आणि लग्न करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले.
लोकांनी गर्लफ्रेंडला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. काही मिनिटांतच परिस्थिती इतकी बिकट झाली की, तिने पोलिसांना फोन केला. काही वेळातच सैद नगली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नवरदेवाला ताब्यात घेतलं. नवरीच्या कुटुंबाचा या घटनेमुळे विश्वासघात झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.