पिंपरी : टपरीवर थांबलेल्या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास निगडीतील अजंठानगर येथे घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. नंदू वसंत चव्हाण (वय ३९, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू सेल्समन म्हणून काम करत होते. दुपारी तीनच्या सुमारास ते अजंठानगर येथील एका शोरूमच्या मागच्या बाजूला एका टपरीवर थांबले होते. त्यावेळी तेथे दुचाकीवरून दोघेजण आले. अचानक त्यांनी चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पिंपरीत सेल्समनचा भरदिवसा कोयत्याने वार करुन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 21:11 IST