मृतदेहाशेजारी मायलेकी 4 तास बसून होत्या, पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:12 IST2022-01-07T14:11:58+5:302022-01-07T14:12:22+5:30

Stabbing Case : पत्नी-मुलीकडून पोलीस हवालदाराची हत्या, मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद

Mother Daughter was sitting next to the body for 4 hours, killing the police constable by stabbing him in the head | मृतदेहाशेजारी मायलेकी 4 तास बसून होत्या, पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

मृतदेहाशेजारी मायलेकी 4 तास बसून होत्या, पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

कल्याण:  मुलगी सासरी नांदत नाही या कारणावरून झालेल्या वादात मुलगी आणि पत्नीकडून पोलिस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री ८ च्या सुमारास पुर्वेकडील नाना पावशे चौक भागात घडली. प्रकाश राजाराम बोरसे ( वय ५५) असे मृत पोलिस हवालदाराचे नाव असून ते मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. हत्येप्रकरणी त्यांची पत्नी ज्योती ( वय ४५) आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.


बोरसे हे गुरूवारी कामावरून संध्याकाळी सात वाजता कोळसेवाडीतील नाना पावशे चौक परिसरातील रहात्या घरी आले.त्यांची मुलगी भाग्यश्री (वय २७) हिचे लग्न झाले असून तीचे सासरकडील आडनाव पवार असे आहे. परंतू तीचे नव-याबरोबर पटत नसल्याने ती आई वडीलांकडेच राहत होती. मुलगी सासरी नांदत नाही यावरून घरात रात्री आठच्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात प्रकाश हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या हत्येची माहीती मिळताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. दोघींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृतदेहाशेजारी चार तास बसून होत्या
कोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून ते घरात शिरले. घरात प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता. तर मृतदेहाशेजारी माय-लेकी बसून होत्या. हत्या करून चार तास त्या मृतदेहाशेजारी बसून होत्या. घटना रात्री आठच्या सुमारास घडली परंतू ती चार तासांनी म्हणजे रात्री 12 वाजता उघडकीस आली.

 

Web Title: Mother Daughter was sitting next to the body for 4 hours, killing the police constable by stabbing him in the head