प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी ९ आठवड्यांची गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:17 IST2021-05-04T18:16:08+5:302021-05-04T18:17:07+5:30
Sexual Abuse : तब्बल अकरा गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने केला अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी ९ आठवड्यांची गर्भवती
जळगाव : घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ती मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती राहिली आहे. दरम्यान, संशयित मोहनसिंग जगदीशसिंग बावरी ( वय १९,रा. तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पीडितेला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आलेले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अल्पवयीन मुलगी गायब झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार ल्पनाबाई सुधाकर गवारे (रा. आयोध्या नगर जळगाव) या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवदर्शनाला जातो असे सांगून कल्पनाबाई हिने पीडितेला पळवून नेले होते, असे तक्रारदारांचे म्हणणे होते पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहनसिंग याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात सोडून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला पळवून नेले.दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती नऊ आठवड्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यानुसार मोहनसिंग याच्याविरुद्ध बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आलेले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.
अटकेतील मोहनसिंग याला उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी मंगळवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे एडवोकेट पंढरीनाथ चौधरी यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील अन्य आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे कारण सांगून पोलीस कोठडीची मागणी केली.
मोहनसिंग बावरी सराईत गुन्हेगार
मोहनसिंग बावरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी, मारामारी, प्राणघातक हल्ला व खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन तर एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आता अपहरण व बलात्काराचा हा सहावा गुन्हा या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल झालेले आहेत.