खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:53 IST2025-12-01T12:52:25+5:302025-12-01T12:53:31+5:30
वैशाली येथील राजापाकर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
बिहारमधील वैशाली येथील राजापाकर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिच्या पालकांनी तिच्या सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांचा असा दावा आहे की, काजलला सतत त्रास दिला जात होता. तिची हत्या करण्यात आली आणि नंतर आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं. सासरच्या मंडळींनी सांगितलं की, वाढदिवस साजरा करण्यावरून पती-पत्नीत झालेल्या वादामुळे काजलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वैशाली जिल्ह्यातील राजापाकर पोलीस स्टेशन हद्दीतील बैकुंठपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. काजल कुमारी असं २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने अनिश कुमारशी लग्न केलं होतं. रविवारी या जोडप्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता, परंतु त्याच दिवशी काजलचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला.
महिलेच्या पालकांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. काजलच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, लग्नापासूनच तिचा सतत छळ केला जात होता. काजलचे सासरच्या लोकांशी अनेकदा वाद होत असत आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत असे. कुटुंबाने कारवाईची मागणी केली आहे. मात्र सासरच्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सासरच्यांनी सांगितलं आहे की, कुटुंबीयांचं काजलवर खूप प्रेम होतं आणि हत्येचा आरोप पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. घटनेची माहिती मिळताच राजापाकर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हे प्रकरण संवेदनशील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हत्या आणि आत्महत्या दोन्ही दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचं कारण कळेल.