"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:18 IST2026-01-10T10:17:34+5:302026-01-10T10:18:41+5:30
सरकारी ज्युनिअर कॉलेजमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्यावर आणि शिक्षण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

AI फोटो
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील मलकाजगिरी येथील सरकारी ज्युनिअर कॉलेजमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्यावर आणि शिक्षण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. शिस्तीच्या नावाखाली करण्यात आलेल्या 'मानसिक क्रूरतेची' बळी ठरलेली इंटरमीडिएटची विद्यार्थिनी वर्षिनी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.
कॉलेजमधील दोन लेक्चरर्सनी विद्यार्थिनीला तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद प्रश्न विचारून इतका त्रास दिला की, ती तो धक्का सहन करू शकली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, वर्षिनी काही कारणास्तव एक दिवस कॉलेजला थोड्या उशिराने पोहोचली होती. कॉलेजच्या लेक्चरर श्री लक्ष्मी आणि मधुरिमा यांनी तिला समज देण्याऐवजी सर्व विद्यार्थ्यांसमोर उभं केलं.
"आम्हाला याचा पुरावा दाखव"
प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबाच्या दाव्यानुसार, लेक्चरर्सनी सर्व मर्यादा ओलांडून विद्यार्थिनीला विचारलं, "इतका उशीर का झाला? तुला मासिक पाळी आली आहे का? नाटक करू नकोस, जर हे खरं असेल तर आम्हाला याचा पुरावा दाखव. वर्गात अशा प्रकारचा प्रश्न सर्वांसमोप विचारल्याने विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला. खूप त्रास झाला, वाईट वाटलं.
नैराश्यात गेली
कॉलेजमधून घरी परतल्यानंतर वर्षिनीची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली होती. ती नैराश्यात गेली होती आणि वारंवार त्या अपमानास्पद वागणुकीची आठवण काढत होती. संध्याकाळी ती अचानक घरात बेशुद्ध होऊन पडली. घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्रचंड मानसिक धक्क्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.
विद्यार्थी संघटना आणि पालकांचा संताप
या दुःखद घटनेनंतर विद्यार्थी संघटना आणि कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. मलकाजगिरी सरकारी कॉलेजच्या बाहेर मोठ्या संख्येने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आरोपी लेक्चरर श्री लक्ष्मी आणि मधुरिमा यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची तसेच त्यांना नोकरीवरून बतर्फ करण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.